उत्तर प्रदेशमधील अलीगड येथील धर्म समाज पदवी महाविद्यालयाच्या पुरूषांच्या स्वच्छतागृहात सीसीटीव्ही कॅमेरा लावल्याचे प्रकरण समोर आल्याने खळबळ उडाली आहे. स्वच्छतागृहात सीसीटीव्ही लावल्याचे समजल्यानंतर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी याचा विरोध करण्यास सुरूवात केली आहे. विद्यार्थी स्वच्छतागृहात जाऊन कॉपी करतात. हा प्रकार रोखण्यासाठी सीसीटीव्ही लावल्याचे स्पष्टीकरण महाविद्यालय प्रशासनाने दिले आहे.

सौरभ चौधरी नावाच्या विद्यार्थ्याने हा प्रकार अत्यंत लाजिरवाणा असल्याचे म्हटले आहे. जर स्वच्छतागृहातून सीसीटीव्ही कॅमेरे काढले नाही. तर महाविद्यालय प्रशासनाविरोधात कायदेशीर कारवाई करू असा इशारा त्याने दिला. संजीवकुमार नावाच्या दुसऱ्या विद्यार्थ्याने याचा निषेध करत स्वच्छतागृहात सीसीटीव्ही कॅमेरे लावणे अनुचित आहे. अशा पद्धतीने महाविद्यालय आम्हाला पाहू शकत नाही, असे त्याने म्हटले.

दरम्यान, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रकाश गुप्ता यांनी मात्र सीसीटीव्ही लावण्याचे समर्थन केले आहे. ते म्हणाले, काही विद्यार्थी स्वच्छतागृहात चिठ्ठ्या, कॉपी लपवून ठेवतात, अशी तक्रार विद्यार्थ्यांनीच केली होती. त्यांच्या तक्रारीनंतरच महाविद्यालय प्रशासनाने स्वच्छतागृहात कॅमेरे लावले.

महाविद्यालयात तीन स्वच्छतागृह आहेत. वॉशरूममध्ये कॅमेरा लावणे चुकीचे नाही. कॅमेरा यूरिनलच्या मागे फोकस करतो. फुटेज पाहण्यासाठी वेगळी खोली आहे. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिस्वातंत्र्यावर याचा कोणताच परिणाम होणार नाही, असेही गुप्ता यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रीय अल्पसंख्यांक शिक्षण समितीचे सदस्य मानवेंद्र प्रताप सिंह म्हणाले की, विद्यार्थी महाविद्यालय प्रशासनाविरोधात मानहानीचा खटला दाखल करू शकतात. स्वच्छतागृहात कॉपी रोखण्यासाठी अनेक पद्धती आहेत. पण सीसीटीव्ही कॅमेरे लावणे चुकीचे आहे.