तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या मृत्यू संदर्भात जी चौकशी करण्यात येते आहे त्यासाठी समिती नेमण्यात आली आहे. या संदर्भात जो आयोग नेमण्यात आला त्या आयोगाने अपोलो रूग्णालयाकडे जयललिता या हॉस्पिटलमध्ये दाखल होत्या तेव्हाचे सीसीटीव्ही फुटेज मागितले. मात्र हे सीसीटीव्ही फुटेज डिलिट झाल्याची माहिती अपोलो रूग्णालयाने न्या. ए अरूमुघस्वामीच्या आयोगाला दिली आहे. २२ सप्टेंबर २०१६ ला जयललिता यांना अपोलो रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर ५ डिसेंबर २०१६ पर्यंत त्यांच्यावर उपचार सुरु होते. या दिवशी म्हणजे ५ डिसेंबर २०१६ ला त्यांची प्राणज्योत मालवली.

आता या संदर्भातले सीसीटीव्ही फुटेज आपल्याकडे नसल्याचे अपोलो रूग्णालयाने म्हटले आहे. सीसीटीव्ही रेकॉर्डिंग ३० दिवसांनी आपोआप डिलिट होते असे रूग्णालय प्रशासनाने आयोगाला सांगितले आहे. जयललिता यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलेले सीसीटीव्ही फुटेज आता डिलिट झाल्याने आम्ही हे फुटेज आपल्यापुढे सादर करू शकत नाही असे रूग्णालयाने सांगितले आहे.

जयललिता यांचे अपोलो रूग्णालयातले सीसीटीव्ही फुटेज डिलिट झाल्याने आता या संदर्भातला चौकशीचा मोठा दुवा निखळला आहे. याआधीही आयोगाने अपोलो रूग्णालयाला जयललितांना दाखल केल्या दिवसापासून त्यांचा मृत्यू होईपर्यंतचे सगळे फुटेज गोळा करण्यास सांगितले होते. मात्र रूग्णालय प्रशासनाने ते देण्यात असमर्थता दर्शवली आहे. या प्रकरणात ज्यांची आत्तापर्यंत चौकशी करण्यात आली आहे त्यामध्ये अपोलो रूग्णालयातल्या १२ पेक्षा जास्त डॉक्टरांचा समावेश आहे. तसे काही पोलीस अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्यात आली आहे. २०१७ मध्ये हा आयोग नेमण्यात आला होता.