वॉशिंग्टन पोस्टसाठी लिहिणारे पत्रकार जमाल खशोगी यांची अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली. या हत्येला तीन महिने उलटले आहेत. ज्यानंतर एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये जमाल खशोगी यांना ठार केल्यानंतर त्यांच्या मृतदेहाचे तुकडे सूटकेस आणि बॅगांमध्ये भरुन घेऊन जात असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. तुर्की येथील टीव्ही चॅनल ए हेबरने हा दावा केला आहे. तीन माणसं पाच सूटकेस घेऊन जात आहेत. या सूटकेसमध्ये जमाल खशोगी यांच्या मृतदेहाचे तुकडे आहेत असा दावा या वाहिनीने केला आहे.

ए हेबरने दिलेल्या वृत्तानुसार इस्तंबूलमध्ये असलेल्या सौदी अरब दुतावासाबाहेर जी माणसे पाच सूटकेस घेऊन जाताना दिसत आहेत त्या सूटकेसमध्ये जमाल खशोगी यांच्या मृतदेहाचे तुकडे भरण्यात आले आहेत. २ ऑक्टोबरला जमाल खशोगी हे या दुतावासात गेले होते तिथेच त्यांची हत्या करण्यात आली असाही दावा ए हेबर या वृत्तवाहिनीने केला आहे.

जमाल खशोगी यांची हत्या झाल्यानंतर त्यांचे शव सापडले नाही. या घटनेचे गूढ सोडव्यासाठी पोलीस प्रयत्न करत आहेत. अशात ए हेबर या वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तामुळे खळबळ माजली आहे. यासंदर्भातले सीसीटीव्ही फुटेजच या वाहिनीने दाखवले आहे. ज्यामध्ये तीन माणसे पाच सुटकेस घेऊन जाताना दिसत आहेत. या पाचही सुटकेसमध्ये खशोगी यांच्या मृतदेहाचे तुकडे आहेत असे या वाहिनीने म्हटले आहे.