11 November 2019

News Flash

प्रशिक्षणार्थी एअरहोस्टेसवर चाकू हल्ला, थरार सीसीटीव्हीत कैद

हल्लेखोराचे नाव आदिल असल्याची मुलीच्या पालकांची पोलिसांकडे माहिती

आपल्याला माहितीये की दिल्ली या राजधानीची ओळख क्राईम सिटी अशीच आहे. महिलांसाठी राजधानी अजिबात सुरक्षित नाहीये, निर्भया प्रकरणापासून दिल्लीतले गुन्हे जास्त प्रमाणात बाहेर येऊ लागले. आता दिल्लीतल्या इशान्य भागात हवाई सुंदरी होण्याचे प्रशिक्षण घेणाऱ्या एका २१ वर्षांच्या तरूणीला एका तरूणाने भोसकले आहे, या प्रकारानंतर हल्ला झालेल्या तरूणीला तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. या मुलीवर त्या तरूणावे वार केले, त्यानंतर तो तातडीने तिथून पळून गर्दीत सामील झाला, ही सगळी दृश्यं सीसीटीव्ही कॅमेरात दिसत आहेत. याप्रकरणी पोलिसांत गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.

मंगळवारी संध्याकाळी ही धक्कादायक घटना घडली आहे. या व्हिडीओमध्ये हे दोघेजण भांडताना दिसत आहेत, तसेच त्यानंतर तो मुलगा या मुलीवर चाकूने वार करतो आहे हे स्पष्ट दिसते आहे. हल्लेखोर तरूण फरार असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत. त्याचे नाव आदिल असल्याचे तरूणीच्या आई वडिलांनी सांगितले आहे. या आदिलवर दिल्लीतल्या पोलीस ठाण्यात कार चोरीचा गुन्हा दाखल आहे. तसेच आदिल हा आपल्या मुलीच्या मागे वर्षभरापासून लागला होता असेही या मुलीच्या आई वडिलांनी सांगितले आहे.

२१ वर्षीय मुलगी दिल्लीतल्या एका एअरहोस्टेस अॅकॅडमीमध्ये शिकत होती. या तरूणीच्या घराबाहेरच तिच्यावर हल्ला करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वीच आदिलने दिल्ली सोडली होती. मात्र या तरूणीवर हल्ला करण्यासाठी तो परतला, आता पुन्हा फरार झाला आहे, मात्र आम्ही लवकरच त्याला अटक करू अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

याआधीही दिल्लीमध्ये अशा प्रकारचे गुन्हे घडले आहेत. रेप कॅपिटल अशी दिल्लीची ओळख आहेच. दिल्ली हे भारताच्या सत्तेचे केंद्र मानले जाते इतकेच नाही तर ही देशाची राजधानी असून या ठिकाणी राजकीय घडमोडींना दररोज वेगही येत असतो. अशात या शहरातली गुन्हेगारी काही कमी झालेली दिसत नाही. महिलांवरचे अत्याचार असोत किंवा इतर काही गुन्हे असोत दिल्लीत या सगळ्याचे प्रमाण वाढलेले दिसून येते आहे.

गजबलेल्या परिसरात एका तरूणीवर हल्ला होतो, तरीही पोलीस काहीही करू शकत नाहीत यावरून गुन्हेगारीची पाळंमुळं किती खोलवर रूजली आहेत हे समोर येते आहे. आता या तरूणीवर हल्ला करणाऱ्या आदिलला लवकरात लवकर पकडून त्याला कठोर शिक्षा केली जावी अशी मागणी तिच्या आई वडिलांनी केली आहे.

First Published on July 6, 2017 4:03 pm

Web Title: cctv shows young delhi woman being stabbed by man