नववर्षांपासून भारत-पाकिस्तान सीमेवरील शस्त्रसंधीचे उल्लंघन करून सुरू केलेला गोळीबार पाकिस्तानने भारताने नोंदवलेल्या निषेधाला झुगारून मंगळवारीही सुरू ठेवला. मंगळवारी पाकिस्तानने जम्मू-काश्मीरच्या कथुआ आणि सांबा जिल्ह्य़ांतील ६० हून अधिक गावे आणि अनेक चौक्यांवर उखळी तोफांचा मारा आणि गोळीबार केला. काही गोळे भारतीय हद्दीत बरेच आत पडले.
पाकिस्तानने उकरून काढलेल्या या कुरापतीत आतापर्यंत भारताचे चार जवान शहीद झाले आहेत तर एक नागरिक महिला मृत्युमुखी पडले आहेत, तर पाकिस्तानच्या पाच रेंजर्सना आपण कंठस्नान घातले आहे.
पाकिस्तानने चालवलेल्या गोळीबारामुळे कथुआ आणि सांबा या सीमावर्ती जिल्ह्य़ांतील सुमारे १०,००० नागरिकांनी सुरक्षित स्थळी स्थलांतर केले आहे. त्यापैकी ७,५०० जणांनी सरकारतर्फे चालवल्या जाणाऱ्या छावण्यांत आश्रय घेतला आहे.
पाकिस्तानी रेंजर्सच्या हल्ल्यात सोमवारी शहीद झालेल्या देविंदर सिंग या जवानाला श्रद्धांजली वाहिल्यानंतर भारतीय सीमा सुरक्षा दलाचे महासंचालक डी. के. पाठक यांनी म्हटले की, आम्ही स्वस्थपणे पाकिस्तानी गोळ्या झेलत बसू शकत नाही. आम्हाला सीमेवर शांतता हवी आहे, पण पाकिस्तानने गोळीबार केल्यास आम्हीही चोख प्रत्त्युत्तर देऊ.
पाठक यांनी असेही सांगितले की सीमा सुरक्षा दलाने दिलेले निषेधाचे खलिते घेण्यास पाकिस्तानने नकार दिला. त्यामुळे सीमेवरील दोन्ही देशांच्या सुरक्षा दलांत असलेला संवाद थांबला आहे. सीमा सुरक्षा दलाने संघर्षग्रस्त भागात ३ जानेवारीला पाकिस्तानी सुरक्षा दलांना धाडलेला निषेधाचा खलिता घेण्यास त्यांनी नकार दिला. त्यामुळे आपल्या सुरक्षा दलांनी तो वाघा सीमेवरून देण्याचा प्रयत्न केला. पण तोही स्वीकारण्यास पाकिस्तानने नकार दिला. त्यामुळे ४ जानेवारीपासून सीमेवरील संवादाच्या प्रक्रियेला खीळ बसली आहे.
पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांनी म्हटले आहे की आम्ही शांतता राखण्याचा प्रयत्न करत आहोत, पण भारत आक्रमक पवित्रा घेत आहे. यावर पाठक म्हणाले की पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांच्या वक्तव्यावर मला कोणतीही प्रतिक्रिया द्यायची नाही. मला इतकेच सांगायचे आहे की आम्हाला सीमेवर कायमच शांतता हवी आहे. पण कोणी तिचा भंग करायचा प्रत्न केला तर आम्ही उत्तर देऊ. आम्ही कधी सुरुवात केलेली नाही. सध्याची परिस्थिती देन्ही देशांना हितावह नाही. आपल्याप्रमाणेच त्यांच्या बाजूलाही नागरिकांचे स्थलांतर झाले आहे. परिस्थिती लवकर निवळावी, अशीच आमची अपेक्षा आहे. दरम्यान, या माऱ्यामुळे सीमेवर तणाव वाढला आहे.