News Flash

पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन, एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

पाकिस्तानी सैन्यांकडून एका आठवड्यात ६० पेक्षा अधिक वेळा शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं आहे

संग्रहित छायाचित्र

भारतीय वायुदलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांची सुटका करत आपण शांततेसाठी पुढाकार घेत असल्याचं सांगणाऱ्या पाकिस्तानचा दुटप्पीपणा अजूनही सुरु आहे. सीमारेषेवर पाकिस्तानी सैन्याकडून अद्यापही शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं जात आहे. पुंछमध्ये रात्री पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला असून यामध्ये दोन चिमुरड्यांचा समावेश आहे. दोघे गंभीर जखमी आहेत.

पाकिस्तानी सैन्यांकडून एका आठवड्यात ६० पेक्षा अधिक वेळा शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं आहे. सलग आठव्यांदा त्यांनी शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं. पाकिस्तानी सैन्यांनी केलेल्या गोळीबारात रुबाना कौसर, त्यांचा मुलगा फजान आणि मुलगी शबनम यांचा मृत्यू झाला.

काश्मीरमध्ये पाच जवान शहीद ; एका नागरिकाचाही मृत्यू
कुपवाडा जिल्ह्य़ात दहशतवाद्यांशी शुक्रवारी झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांचे पाच जवान शहीद झाले तर घटनास्थळावर झालेल्या धुमश्चक्रीत एका नागरिकाचाही मृत्यू झाला. शहीद झालेल्यांमध्ये सीमा सुरक्षा दलाचा (सीआरपीएफ) एक निरीक्षक आणि जवान, त्याचबरोबर लष्कराचे दोन जवान आणि एक पोलीस यांचा समावेश आहे. चकमकीत चार जवान जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

कुपवाडातील बाबगुंद परिसरातीस एका घरात दहशतवादी लपल्याची माहिती मिळताच सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घातला आणि शोधमोहीम हाती घेतली. त्या वेळी दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबाराला सुरक्षा दलांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले. दहशतवादी लपून बसलेल्या घराच्या दिशेने सुरक्षा कर्मचारी जात असताना झालेल्या चकमकीत पाच जवान शहीद झाले.

चकमकीच्या ठिकाणी युवकांचा एक गट आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांमध्ये झालेल्या संघर्षांत एका नागरिकाचा मृत्यू झाला तर चार जण जखमी झाले, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान, पाकिस्तानी लष्कर युद्धबंदीचा भंग करून सीमेवर जोरदार गोळीबार आणि तोफांचा मारा करीत आहे. त्यात काही नागरिक जखमी झाल्याचे, तर अनेक ग्रामस्थांनी स्थलांतर केल्याचे वृत्त आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 2, 2019 9:21 am

Web Title: ceasefire violation by pakistan army in jammu kashmir
Next Stories
1 पश्चिम रेल्वेवर हाय अलर्ट, दहशतवादी हल्ल्याची भीती
2 अभिनंदन मायदेशी परतण्यामागे नरेंद्र मोदींचा पराक्रम – स्मृती इराणी
3 पाकिस्तानने जबरदस्ती व्हिडीओ रेकॉर्ड करायला लावल्याने अभिनंदन यांना झाला उशीर
Just Now!
X