पाकिस्तानचा दुटप्पी चेहरा पुन्हा एकदा समोर आला आहे. काही तासांपूर्वी शांतता आणि चर्चेची भाषा करणाऱ्या पाकिस्तानने जम्मू-काश्मीरच्या पूँछ जिल्ह्यातील कृष्णा घाटी आणि मेंढार सेक्टरमध्ये शस्त्रसंधीचे उल्लंघन करत भारतीय पोस्टच्या दिशेने गोळीबार केला आहे.
आज सकाळी पाकिस्तानच्या फायटर विमानांनी भारतीय लष्कराच्या तळावर हल्ल्याचा अयशस्वी प्रयत्न केला. सर्तक असलेल्या इंडियन एअर फोर्सच्या वैमानिकांनी पाकिस्तानचा हा डाव हाणून पाडत पाकिस्तानी विमानांना पिटाळून लावले.

त्यानंतर काही तासांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचा व्हिडिओ रेकॉर्ड केलेला एक संदेश प्रसारीत झाला. त्यामध्ये त्यांनी भारताबरोबर शांतता आणि चर्चेची भाषा केली. पुलवामामध्ये जी दु:खद घटना घडली तिची चौकशी करण्यास व दहशतवादासंदर्भात चर्चा करण्यास आम्ही तयार आहोत असे त्यांनी सांगितले. त्यानंतर काही तासांनी पाकिस्तानी सैन्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले.

काल भारतीय वायूसेनेने पीओकेत जाऊन दहशतवादी तळांवर केलेल्या कारवाईमुळे बिथरलेल्या पाकिस्तानी सेनेने नियंत्रण रेषेवर गोळीबार केला होता. भारतीय लष्कराकडून त्यांना चोख प्रत्युत्तर देण्यात आले. भारताने दिलेल्या प्रत्युत्तरात पाकिस्तानच्या ५ चौक्या उद्धवस्त झाल्या. या कारवाईत पाकिस्तानचे अनेक सैनिक जखमी झाले.