भारतीय हवाई दलाच्या आक्रमक हल्ल्यामुळे खवळलेल्या पाकिस्तानने सीमेजवळ भारताच्या दिशेने दुपारपासून गोळीबार सुरु केला आहे. या गोळीबाराला भारतीय जवानांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. याद्वारे नौशेरा, राजौरी आणि अखनूर सेक्टरमध्ये पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. इतकेच नव्हे पाकिस्तानी सैन्याने मेंढर आणि पुंछ जिल्ह्यातील कृष्णा खोऱ्यातही गोळीबार केला आहे.

पाकिस्तानस्थित जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनांच्या तळावर भारताकडून करण्यात आलेल्या हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानी सरकारमध्ये खळबळ माजली आहे. भारताच्या कारवाईनंतर पाकिस्तानच्या पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली नॅशनल सिक्युरिटी कमिटीची बैठक पार पडली. यावेळी पाकिस्तानेच परराष्ट्रमंत्री शाह महूद कुरैशी यांनी भारताकडून दहशतवादी तळांना टार्गेट करण्यात आल्याचे आणि मोठ्या संख्येने दहशतवाद्यांना मारल्याच्या वृत्ताचा इन्कार केला आहे. त्यानंतर त्यांनी भारताच्या या कारवाईला उत्तर देण्यासाठी पाकिस्तान वेळ आणि जागा आपल्या हिशोबाने ठरवेल असे म्हटले आहे.

पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री म्हणाले, ज्या जागेवर हा हल्ला करण्यात आल्याचा दावा केला जात आहे ती जागा खुली आहे. जगातील लोक ही जागा पाहू शकतात. यासाठी स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय मीडियाला त्या ठिकाणी घेऊन जाण्यात येईल. पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी त्यांच्या सैन्याला आणि जनतेला निर्देश दिले आहेत की, त्यांनी सर्वांनी अशा परिस्थितीसाठी तयार असायला हवे.