श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या आर. एस. पुरा आणि अखनूर या सीमावर्ती भागात पाकिस्तानकडून शनिवारी पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले आहे. पाकिस्तानी रेंजर्सकडून झालेल्या या गोळीबाराला बीएसएफच्या जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले असून ४ पाकिस्तानी सैनिकांना कंठस्नान घातले आहे. दरम्यान, या गोळीबारात भारताचा एक जवान शहीद झाला असून २ नागरिकही ठार झाले आहेत.

सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती सुरुच असून शुक्रवारी पाकिस्तानच्या गोळीबारात दोन नागरिकांचा मृत्यू झाला होता. सांबा, अरनिया, कठुआ, आर एस पुरा सेक्टर येथील भारतीय सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) चौक्यांना पाकने लक्ष्य केले होते. यावेळी भारतीय जवानांनीही पाकला चोख प्रत्युत्तर दिले होते. गुरुवारी रात्रीपासून सीमा रेषेवर गोळीबार सुरु असल्याने सीमेलगतच्या गावात भीतीचे वातावरण पसरले होते. शनिवारी पुन्हा पाकिस्तानकडून गोळीबार झाल्याने यात आणखीनच भर पडली आहे.

सीमारेषेवर पाकिस्तानी रेंजर्सने गुरुवारी रात्री पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले होते. पाक रेंजर्सने उखळी तोफांचा माराही केला होता. आर. एस. पुरा, अरनिया, रामगड, सांबा या भागांमधील बीएसएफच्या सुमारे ६० चौक्यांना पाक रेंजर्सनी लक्ष्य केले होते. याचा फटका सीमेलगच्या निवासी भागालाही बसला. आर. एस. पुरा सेक्टरमध्ये बचनोदेवी आणि सुनील कुमार या दोघांचा गोळीबारात मृत्यू झाला आहे. तर चार जण यात जखमी झाले असून जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. शुक्रवारी सकाळपर्यंत गोळीबार सुरुच होता. शस्त्रसंधीच्या उल्लंघनाच्या पार्श्वभूमीवर सीमारेषेवरील गावांमधील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली होती. तसेच गावातील रुग्णालयांनाही सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले होते.

बुधवारी रात्री देखील पाक सैन्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले होते. यात बीएसएफचा एक जवान आणि सीमेलगतच्या गावात राहणाऱ्या १९ वर्षांच्या तरुणीचा मृत्यू झाला होता. भारतीय सैन्याने सडेतोड प्रत्युत्तर देत पाकच्या दौन चौक्या उद्ध्वस्त केल्या. भारताच्या प्रत्युत्तरात १७ पाक सैनिक ठार झाल्याचे वृत्त आहे. मात्र पाक सैन्याने हा दावा फेटाळून लावला. गोळीबारात दोन महिलांचा मृत्यू झाला. तर पाच जण जखमी झाले, असे पाक सैन्याच्या प्रवक्त्यांनी म्हटले होते.

मात्र, शनिवारी पहाटे पाकिस्तानी रेजंर्सकडून झालेल्या गोळीबाराला भारताने चोख प्रत्युत्तर दिले असून यात ४ पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू झाला आहे.