सीमारेषेवर पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे सातत्याने उल्लंघन करण्यात येत आहे. जम्मू-काश्मीरच्या आरएसपुरा सेक्टरमध्ये गेल्या २० तासांमध्ये पाक सैन्याकडून अनेकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले आहे.  यामध्ये आतापर्यंत ११ नागरिक जखमी झाले असून या भागातील घरांचेही मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे. दरम्यान, भारतीय लष्कराकडूनही पाकच्या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिले जात आहे. BSF च्या जवानांकडून करण्यात येत असलेल्या जोरदार प्रतिहल्ल्यांमध्ये पाक रेंजर्सच्या पाच ते सहा चौक्या उद्ध्वस्त झाल्याचे समजत आहे. याशिवाय, राजौरीतील नौशेरा येथे भारतीय लष्कराने केलेल्या गोळीबारात तीन पाकिस्तानी जवान ठार झाले आहेत. दरम्यान, पाकिस्तानी सैन्याने अरनिया सेक्टरमधील BSF च्या चौक्यांवरही गोळीबार केल्याचे समजत आहे.
पाकिस्तानने मंगळवारी केलेल्या गोळीबाराचा सीमारेषेवरील निवासी भागाला फटका बसला होता. या गोळीबारात सात जण जखमी झाले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. यापूर्वी गेल्या आठवड्यात पाकिस्तानच्या गोळीबारात बीएसएफचा एक जवान शहीद झाला होता. तर भारतीय सैन्याने दिलेल्या प्रत्युत्तरात पाकिस्तानच्या सात जवानांचा मृत्यू झाला होता. पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन होत असल्याने सीमा रेषेवरील गावात राहणा-या ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. आमच्याकडे खाण्यासाठी पुरेसे अन्न नाही. आता गावात राहायची भीती वाटते. पण गाव सोडून अन्यत्र जाऊ शकत नाही अशी प्रतिक्रिया एका ग्रामस्थाने दिली आहे.