गेल्या दोन दिवसांपासून आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानकडून होणारी आगळीक खपवून घेतली जाणार नाही. शस्त्रसंधीचे उल्लंघन करीत पाककडून गोळीबार झाल्यास प्रत्युत्तरात भारत चोख प्रत्युत्तर देईल, असे भारताचे परराष्ट्र सचिव एस.जयशंकर म्हणाले. पाकच्या वाढत्या कुरापतींचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी गुरूवारी नवी दिल्लीत परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज, संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांच्यासोबत तातडीची बैठक घेतली. या बैठकीनंतर जयशंकर यांनी निवेदन सादर केले. पाकव्याप्त काश्मिरात पाडण्यात आलेले ‘ड्रोन’ विमान भारताचे असल्याचा पाकिस्तानचा दावा यावेळी जयशंकर यांनी फेटाळून लावला. छायाचित्रांच्या पाहणीनुसार पाक दावा करत असलेले ड्रोन विमान भारतीय बनावटीचे नाही. सीमेवर दोन्ही बाजूंकडून शांतता प्रस्थापित होण्यासाठी भारत कटीबद्ध आहे. त्यामुळे हे कृत्य भारताकडून होणे शक्यच नाही, असे जयशंकर म्हणाले. पाक व्याप्त काश्मिरात भारताने हेरगिरीसाठी पाठविलेले ड्रोन विमान पाडण्यात आल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे.
दरम्यान, दिल्लीच्या नॉर्थ ब्लॉकयेथील गृह मंत्रालयात झालेल्या या बैठकीला राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवल देखील उपस्थित होते. सीमेवर गेल्या दोन दिवसांत पाककडून झालेले शस्त्रसंधीचे उल्लंधन आणि पाकव्याप्त काश्मिरात हेरगिरीसाठी भारताने पाठविलेले ‘ड्रोन’ विमान पाडल्याचा पाकिस्तानने केलेला दावा, याचा सविस्तर आढावा बैठकीत घेण्यात आला. सीमा सुरक्षा दलाचे डी.के.पाठक यांनीही आज अजित दोवल यांची भेट घेऊन सीमा भागातील परिस्थितीची माहिती दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जम्मू दौऱ्याला दोन दिवस उरले असतानाच जम्मूच्याच अखनूर भागात पाकिस्तानी रेंजर्सनी बुधवारी सकाळी सीमा सुरक्षा दलाच्या चौक्यांवर तोफगोळ्यांचा जोरदार मारा तसेच गोळीबार केला होता.  लष्कराने आंतरराष्ट्रीय सीमेवरील माऱ्याला चोख प्रत्युत्तर दिले असून हेरगिरीच्या आरोपांचा इन्कार केला. विशेष म्हणजे दहशतवादविरोधी लढय़ाच्या निमित्ताने भारत आणि पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी रशियात ऐतिहासिक सहमती दर्शवून एक आठवडाही उलटत नाही तोच पाकिस्तानच्या कुरापती वाढल्या आहेत. यापार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे.