जम्मू-काश्मीरमधील सीमारेषेवर पाकिस्तानकडून सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन करून भारतीय छावण्यांवर गोळीबार करण्यात येत असल्याचा विषय गंभीर बनला असून, केंद्र सरकारने कडक भूमिका घेऊन पाकिस्तानसोबत हा विषय सोडवला पाहिजे, अशी मागणी जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी शुक्रवारी केली.
भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमधील शांतता प्रक्रियेचा शस्त्रसंधी करार हा महत्त्वाचा भाग असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. सातत्याने होणाऱया या गोळीबारामागे नक्की कोण आहे, हे अजून मला समजत नाही. नुकतीच आपल्या पंतप्रधानांनी पाकिस्तानच्या पतंप्रधानांसोबत याच विषयावर चर्चाही केली. त्यावेळी सीमारेषेवरील दोन्ही देशांचे अधिकारी बैठक घेऊन यावर तोडगा शोधतील, असे ठरले होते. मात्र, त्यानंतर यावर उपाय मिळण्याऐवजी हा प्रश्न दिवसेंदिवस गहन होत चालला असल्याचे ओमर अब्दुल्ला म्हणाले.
काश्मीरमधील नागरी वस्ती असलेल्या भागामध्ये गुरुवारी करण्यात आलेल्या हल्ल्यामध्ये काही मुले जखमी झाली आहेत. नागरी वस्तीवरही हल्ला करण्याच्या त्यांच्या कृतीमुळे त्यांचा उद्देश वाईट असल्याचे स्पष्ट होते आहे. त्यामुळेच केंद्र सरकारने कडक भूमिका घेऊन हा विषय तडीस नेला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.