शेजारी देशाकडून शस्त्रसंधीचे वारंवार उल्लंघन होत आहे. सद्यस्थितीत शस्त्रसंधीच्या घटनांचे प्रमाण कमी झाले आहे. पण सीमेपलिकडून होणारा गोळीबार सुरूच राहिला तर, पुन्हा सर्जिकल स्ट्राईक केला जाऊ शकतो, असा थेट इशारा लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी पाकिस्तानला दिला आहे. पाकिस्तानच्या छुप्या युद्धामुळे भारतातील सामाजिक वातावरण बिघडत आहे, असेही ते म्हणाले.

नवनियुक्त लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर शुक्रवारी पहिल्यांदाच पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी असंतुष्ट जवानांचे सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडीओ, पाकिस्तानकडून होणारे शस्त्रसंधीचे उल्लंघन, लष्कराच्या पूर्व विभागाचे कमांडर यांच्यासोबतचे मतभेद यांसह अनेक मुद्द्यांवर त्यांनी भाष्य केले. असंतुष्ट जवानांनी आपल्या तक्रारी सोशल मीडियावरून करण्याची गरज नाही, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. जवानांच्या तक्रारींसाठी उत्तम व्यवस्था उभारण्यात येईल, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.

सीमेपलिकडून वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन होत आहे. या गंभीर मुद्द्याकडेही रावत यांनी लक्ष वेधले. अलिकडील दिवसांत शस्त्रसंधी उल्लंघनाच्या घटना कमी झालेल्या आहेत. पण असे झाले नाही तर, सर्जिकल स्ट्राईकसारखी पावले उचलली जाऊ शकतात, असा गर्भित इशारा त्यांनी पाकिस्तानला दिला आहे. नजरचुकीने नियंत्रण रेषेपलिकडे गेलेला मूळचा धुळ्यातील जवान चंदू चव्हाण याच्या भारतातील ‘वापसी’बाबतही त्यांनी यावेळी माहिती दिली. चंदू चव्हाण हा जवान आमच्या ताब्यात आहे, असे पाकिस्तानकडून सांगण्यात आले आहे. जवानाला परत आणण्याची एक प्रक्रिया असते. त्याचे पालन केले जाईल, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

भारतीय लष्कराला विविध आव्हानांचा सामना करण्यासाठी सक्षम बनवण्यात येत आहे. शस्त्रांस्त्रांसह विविध विभागांत तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे, अशी माहिती रावत यांनी यावेळी दिली. जवानांनी संघभावनेतून काम करावे, असे आवाहनही त्यांनी केले.