दिल्लीत झालेल्या मुसळधार पावसामुळे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानातील छताचा भाग कोसळला. अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानात असलेल्या एका खोलीचे छत कोसळले. या खोलीत अरविंद केजरीवाल यांनी गेल्या काही महिन्यांपासून अनेक बैठका घेतल्या होत्या. खासकरुन करोना काळातल्या अनेक बैठका या खोलीतच झाल्या होत्या. दरम्यान झालेल्या घटनेत कुणालाही दुखापत झालेली नाही. जेव्हा केजरीवाल यांच्या घरातील खोलीचं छत कोसळलं तेव्हा त्या खोलीत कुणीही नव्हतं अशी माहिती तेथील अधिकाऱ्याने दिली आहे. खोलीचा हा भाग सतत होणाऱ्या मुसळधार पावसामुळे कोसळला.

दरम्यान ही घटना समजताच दिल्लीतील सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांनी केजरीवाल यांच्या निवासस्थानाला भेट दिली. या निवासस्थानाचे बांधकाम त्यांनी पुन्हा एकदा तपासले. या संबंधीचा अहवाल लवकरच सादर केला जाणार आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे या निवासस्थानात २०१५ मध्ये राहण्यास आले. हे निवासस्थान १९४२ मध्ये बांधण्यात आले आहे. या निवासस्थानात राहण्याआधी अरविंद केजरीवाल हे एका थ्री बीएचके फ्लॅटमध्ये वास्तव्य करत होते. दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित या मात्र या निवासस्थानात रहात नव्हत्या. त्या मोतीलाल नेहरु मार्गावर असलेल्या त्यांच्या निवासस्थानी वास्तव्य करत होत्या. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातले वृत्त दिले आहे.