भारताचा ७१ वा प्रजासत्ताक दिन आज देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. राजधानी दिल्लीत यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरुन देशवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. दरम्यान, राजपथावर विविध चित्ररथांच्या माध्यमातून देशाच्या सामर्थ्याचे आणि संस्कृतीचे दर्शन घडले. या प्रमुख सोहळ्यात सकाळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते सकाळी ध्वाजारोहण झाले यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, इतर मंत्री आणि मान्यवर उपस्थित होते. दरम्यान, यंदा ब्राझिलचे राष्ट्रपती जेर मेसिअस बोलसोनारो हे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते.

प्रजासत्ताक दिनानिमित्त सकाळपासूनच विविध राज्यांच्या मुख्य कार्यक्रमात ध्वजारोहणासह सुरक्षा दलांच्या परेड आणि सांस्कृतीक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतरही दिवसभर विविध कार्यक्रमांची रेलचेल सुरु आहे. विशेषतः भारतीय सैन्याच्या तिन्ही दलांनी यंदाही वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने यंदाचा प्रजासत्ताक दिन साजरा केला. यावेळी राजपथावर लष्कर, नौदल आणि हवाई दलाच्यावतीने चित्तथरारक प्रात्यक्षिकं सादर करण्यात आली. त्याचबरोबर देशाकडे असलेल्या शस्त्र-अस्त्रांचे दर्शनही घडवण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरुवातीला राष्ट्रीय युद्ध स्मारक येथे जाऊन शहिदांना श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर ते प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य सोहळ्यासाठी राजपथाकडे रवाना झाले.

लडाख येथे तैनात असलेल्या इंडो-तिबेटियन बॉर्डर फोर्सच्या (आयटीबीपी) पोलिसांनी उणे २० डिग्री तापमानात तब्बल १७,००० फूट उंचावर राष्ट्रध्वज हाती घेत ‘भारत माता की जय’चा जयघोष करीत आणि ‘वंदे मातरम’ हे राष्ट्रीय गीत गात प्रजासत्ताक दिन साजरा केला.
दरम्यान, मुंबईत शिवाजी पार्क येथे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्य सोहळ्यात ध्वजारोहण केलं. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी उपस्थित होत्या. यावेळी राज्यपालांनी जीपमधून सज्ज असलेल्या पोलीस दलाची पाहणी केली. त्यानंतर पोलीस तुकड्यांची परेडद्वारे देण्यात आलेली मानवंदना स्विकारली.

तसेच काही खासगी कार्यक्रमांदरम्यान, मुंबई आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला संस्थेच्या परिसरात लांब तिरंगाध्वजासह मार्च काढला होता. तसेच नागपूर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात संघाचे सरचिटणीस भय्याजी जोशी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. उत्तराखंड येथील एका मंदिरात देवासमोर तिरंग्याच्या तीन रंगामध्ये फुलांची आरास करण्यात आली होती. दिल्लीच्या शाहीन बाग येथे देखील ध्वाजरोहण करण्यात आले. मध्य रेल्वेच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथे ध्वजारोहण करण्यात आले.