पेट्रोल पंपावार मोबाइल वापरुन नका असे फलक लावलेले असतनाही अनेकजण त्याकडे दुर्लक्ष करतात. मात्र अशाप्रकारे दिलेल्या सुचनांकडे दुर्लक्ष करणे आंध्रप्रदेशातील गुंटूरमधील एका तरुणास चांगलेच महागात पडले. पेट्रोल पंपावर मोबाइल वापरत असतानाच या तरुणाच्या मोबाइलला अचानक आग लागली आणि एकच गोंधळ उडाला. हा सर्व प्रकार पेट्रोल पंपावरील सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाला आहे.

गुंटूरमधील सटेनापल्ले येथे २० ऑक्टोबर रोजी ही घटना घडली. इंडियन ऑइलच्या पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी रांगेत उभा असणारा तरुण फोनवर चॅटिंग करत होता. त्या तरुणाचा नंबर आल्यानंतर पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याने पेट्रोल भरण्यास सुरुवात केल्यानंतरही हा तरुण फोनवर मेसेज करण्यात गुंग होता. अचानक त्याच्या फोनने पेट घेतला. फोनला आग लागल्याचे पाहताच सर्वजण इकडे तिकडे पळू लागले. मात्र पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांनी बाईकला लागलेली आग अग्निशामक वायूच्या मदतीने विझवली. आग विझवल्यानंतर हा तरुण स्वत:ची अर्धी जळालेली बाईक घेऊन पेट्रोल पंपावरुन निघून गेला.

पेट्रोल पंपावर मोबाइल वापरुन नका अशा सूचना अनेकदा कर्मचाऱ्यांकडून दिल्या जातात मात्र ग्राहक त्याकडे दुर्लक्ष करतात आणि त्यामुळे असे अपघात होतात असं मत पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांनी व्यक्त केलं आहे.