चित्रपट निर्माता सुमन घोष यांनी नोबेलविजेते शास्त्रज्ञ अमर्त्य सेन यांच्या आयुष्यावर तयार केलेल्या माहितीपटावरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. ‘Argumentative Indian’ या नावाने बनविण्यात आलेल्या या माहितीपटातील काही शब्दांवर सेन्सॉर बोर्डाने आक्षेप घेतला आहे. हे शब्द चित्रपटातून वगळले तरच चित्रपटाच्या प्रदर्शनाला परवानगी दिली जाईल, अशी सूचना सेन्सॉर बोर्डाने दिली होती. मात्र, चित्रपटाचे निर्माते सुमन घोष यांनी सेन्सॉर बोर्डाविरोधात दंड थोपटून उभे राहण्याचा पवित्रा घेतला आहे. सुमन घोष ‘आर्ग्युमेंटेटिव्ह इंडियन’ हा माहितीपट कोलकातामध्ये प्रदर्शित करणार होते. एक तासाच्या या माहितीपटाचे २००२ आणि २०१७ असे दोन भाग आहेत. मंगळवारी ‘सीबीएफसी’च्या प्रादेशिक कार्यालयात तिचं स्क्रीनिंग करण्यात आले. मात्र या डॉक्युमेंट्रीतून ‘गाय’, ‘गुजरात’, ‘हिंदू भारत’, भारताचा ‘हिंदुत्ववादी विचार’ हे शब्द ‘बीप’ वापरुन काढले गेले, तरच ‘U/A’ सर्टिफिकेट देण्यात येईल, असे सेन्सॉर बोर्डाकडून सांगण्यात आले.

Jab Harry Met Sejal: .. तर चित्रपटातील ‘इंटरकोर्स’ शब्द तसाच राहिल

मात्र, सुमन घोष यांनी सेन्सॉर बोर्डाचा हा आदेश मानण्यास नकार दिला आहे. याबद्दल प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी म्हटले की, या माहितीपटात अमर्त्य सेन गुजरातमधील दंगलींविषयी मतप्रदर्शन करतानाचे दृश्य आहे. या दृश्यादरम्यान अमर्त्य सेन यांच्या तोंडी येणारा ‘गुजरात’ शब्दासाठी बीप टोन वापरावा, असे सर्वप्रथम सेन्सॉर बोर्डाकडून सांगण्यात आले. त्यानंतर त्यांनी मला ‘गाय’, ‘हिंदू’ आणि ‘हिंदूत्त्व’ या शब्दांसाठीही बीप टोन वापरण्यास सांगितले. माझ्या मते हे खूपच हास्यास्पद असून आम्ही यावर आक्षेप नोंदवला आहे. यापूर्वी ‘उडता पंजाब’ आणि ‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’ हे चित्रपट सेन्सॉर बोर्डासोबतच्या मतभेदांमुळे कशाप्रकारे वादात सापडले आहेत, हे आपल्याला माहितीच आहे. या चित्रपटांबरोबर जे झाले ते चुकीचेच होते आणि त्याविरोधात आवाज उठवणे, हा त्यांचा हक्कच होता. मात्र, आता माहितीपटांनादेखील हेच निकष लावले जातील, याची मला कल्पना नव्हती. त्यामुळे मला मोठा धक्का बसला आहे. सेन्सॉर बोर्डाचे एकूणच वर्तन अमर्त्य सेन भारतातील ज्या असहिष्णुतेविषयी बोलतात, त्याची आठवण करून देणारे असल्याचे सुमन घोष यांनी सांगितले.