एफटीआयआयच्या संचालकपदी टीव्ही अभिनेते गजेंद्र चौहान यांच्या नियुक्तीवर केंद्र सरकार ठाम असून कोणत्याही परिस्थितीत डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनास महत्त्व न देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. चौहान यांच्या नियुक्तीविरोधात दिल्लीत आलेल्या एफटीआयआयच्या शिष्टमंडळाने आज, केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री अरुण जेटली यांची भेट घेतली. चर्चेदरम्यान शिष्टमंडळाचे म्हणणे ऐकून घेतले असले तरी चौहान यांची नियुक्ती कायम राहणार असल्याचे स्पष्ट संकेत जेटली यांनी शिष्टमंडळास दिले.

ऑस्कर पुरस्काराने सन्मानित रसूल पोकट्टी व चित्रपट निर्माते गिरीश कासरवल्ली यांच्यासह अकरा जणांच्या शिष्टमंडळाने संयुक्त सचिव के. संजय मूर्ती यांची भेट घेतली. सुमारे दोन तास चाललेल्या या भेटीदरम्यान शिष्टमंडळाने चौहान यांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून त्यांची नियुक्ती रद्द करण्याची मागणी केली. शिष्टमंडळातील सदस्य केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री अरुण जेटली यांना भेटण्यासाठी अडून बसले होते. अखेर शिष्टमंडळाने जेटली यांची नॉर्थ ब्लॉकमधील कार्यालयात भेट घेतली. जेटली यांनी शिष्टमंडळास कोणतेही आश्वासन दिले नाही. चौहान यांच्या नियुक्तीविरोधात विद्यार्थ्यांच्या एका समूहाने ९ जूनपासून एफटीआयआयमधील तासिकांना उपस्थित न राहण्याचा निर्णय घेतला. गुणवत्ता नसताना चौहान यांची नियुक्ती झाल्याचा आरोप आहे.

विद्यार्थी आक्रमक

एफटीआयच्या संचालकपदी गजेंद्र चौहान यांची नियुक्ती केल्याने संतप्त विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचे लोण दिल्लीतील शास्त्री भवनापर्यंत पोहोचले. विशेष म्हणजे एफटीआय विद्यार्थ्यांचे शिष्टमंडळ व केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये चर्चा सुरू असताना शास्त्री भवनासारख्या अत्यंत महत्त्वाच्या इमारतीसमोर ही निदर्शने सुरू होती.
* ‘कोणत्याही परिस्थितीत एफटीआयआयचे भगवीकरण खपवून घेणार नाही’, असा इशारा निदर्शक विद्यार्थी देत होते. शांततापूर्ण मार्गाने सुरू असलेले हे आंदोलन पोलीस व केंद्रीय राखीव पोलीस दलाने उधळून लावल्याचा एफटीआय विद्यार्थी संघटनेने आरोप केला.चौहान या पदासाठी योग्य नसल्याचा आरोप संघटनांनी केला.