सुदिनांचे दाखले देत आर्थिक सुधारणा राबविण्यावरून केंद्रातील मोदी सरकारवर भारतीय उद्योग जगताने पुन्हा एकदा नाराजी व्यक्त केली आहे. बजाज उद्योग समूहाचे अध्यक्ष व खासदार राहुल बजाज यांनी सरकारच्या राष्ट्रीय उत्पन्नाच्या नव्या आकडेवारीवर थेट आक्षेप घेतला असून मोदी सरकार विकासदाराचा फसवा दावा करीत असल्याची घणाघाती टीका त्यांनी केली. सरकारने  ७.५ टक्के विकासदराची जी फुशारकी मारली आहे, ती अर्थव्यवस्थेशी फारकत घेणारी असून गोंधळात टाकणारी असल्याचेही त्यांनी नमूद केले.
देशातील आघाडीचा वाहन उद्योग समूह असलेल्या बजाज समूहाच्या भागधारकांच्या बैठकीत राहुल बजाज यांनी थेट सरकारच्या धोरणांवरच शाब्दिक हल्ला चढविला. सरकारने नुकतेच जारी केलेले राष्ट्रीय उत्पन्नाचे आकडे हे अधिकतर गोंधळात टाकणारेच आहेत; प्रत्यक्षात अर्थव्यवस्थेत जे आहे त्यापासून तर हे आकडे फारकत घेणारे आहेत, असे स्पष्टपणे बजाज म्हणाले. या नव्या मोजपट्टीत देशाच्या आर्थिक विकासाच्या वाढीचे मापन करणारे घटक अंतर्भूतच नाहीत.
मोदी सरकारच्या आर्थिक सुधारणांवर यापूर्वी आघाडीचे उद्योजक व एचडीएफसी समूहाचे अध्यक्ष दीपक पारेख यांनी आक्षेप घेतला होता. मोदी सरकारच्या ऐन वर्षपूर्तीलाच ‘अर्थ सुधारणेचे वारे दिसत असले तरी ते प्रत्यक्षात नाही’ अशी जाहीर टीका केली होती.

मी अर्थतज्ज्ञ वा सांख्यिकीतज्ज्ञही नाही; पण उद्योजक म्हणून अनेक दशके उद्योग चालवीत आहे. इतर क्षेत्रांतील उद्योगांचे निरीक्षण मी केले आहे. सरकारचा ७.५ टक्के हा विकासदराचा आकडा पटणारा नाही.  उद्योगक्षेत्रात अत्यल्प वाढ झाल्याचे दिसून आले आहे. ऊर्जेच्या किंमतीमुळे कंपन्यांना नफ्यासाठी झगडावे लागले आहे.  आकडेवारी  गोंधळातच टाकणारी आहे.
– राहुल बजाज, अध्यक्ष, बजाज उद्योग समूह