देशात करोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीबद्दल कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली आहे. प्रियांका यांनी सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पावर टीका करत, पंतप्रधान मोदींसाठी नवीन घर बांधण्यासाठी कोट्यावधी रुपये खर्च करण्याऐवजी एवढा पैसा रूग्णांवर खर्च केला तर बरे होईल असे म्हटले आहे.

प्रियांका गांधी यांनी सेंट्रल व्हिस्टाप्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नव्या घराबद्दल टीका केली आहे. देश कोरोनाशी झुंज देत आहे. रुग्णालयात बेड नाहीत, ऑक्सिजनची तीव्र कमतरता आहे, लोकांना वेळेवर औषधे आणि लस उपलब्ध नाहीत आणि या गोष्टींकडे लक्ष देण्याऐवजी पंतप्रधान नवीन घर बांधण्यासाठी कोट्यावधी रुपये खर्च करीत आहेत अशा शब्दात प्रियांका गांधीनी सरकारवर टीका केली आहे.

“देशातील लोक जेव्हा ऑक्सिजन, लस, रुग्णालयातील बेड, औषधे मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत, अशावेळी सरकारने पंतप्रधानांच्या नविन घरासाठी १३ हजार कोटी खर्च करण्यापेक्षा करोना रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी खर्च केले तर बरे होईल. अशा प्रकारच्या खर्चांमुळे अशा प्रकारच्या खर्चामुळे सरकारची प्राथमिकता ही अन्य गोष्टींसाठी आहे असा संदेश लोकांमध्ये जातो,” असे प्रियांका यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

मंगळवारी देशातली सध्याची परिस्थिती पाहता देशात आता संपूर्ण लॉकडाउन लागू करणं हा एकमेव पर्याय असल्याचं ट्विट काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलं होतं. “भारत सरकारला हे लक्षात येत नाहीये की, या वेळी करोनाची ही लाट रोखण्यासाठी संपूर्ण लॉकडाउन हा एकमेव उपाय आहे. मात्र, समाजातल्या काही घटकांना न्याय (NYAY) योजनेचा लाभ घेता यायला हवा. भारत सरकारची निष्क्रियता अनेक निष्पाप लोकांचा बळी घेत आहे,” अशा राहुल गांधी यांनी मोदी सरकारला सल्ला दिला होता.

सेंट्रल व्हिस्टा हा प्रकल्प डिसेंबर २०२२ पर्यंत तयार होणार आहे. या संपूर्ण प्रकल्पासाठी १३,४५० कोटी रुपये खर्च येणार आहे. सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाचा एक भाग पंतप्रधानांच्या निवासस्थानही असणार आहे. डिसेंबर २०२२ पर्यंत हे काम पूर्ण होईल. करोनाच्या काळातही या प्रकल्पाला पर्यावरण मंत्रालयातर्फे सर्व प्रकारच्या मंजुरी देण्यात आल्या आहेत. सेंट्रल व्हिस्टा या प्रकल्पाला अत्यावश्यक सेवा म्हणून मंजुरी देण्यात आली आहे.