महाराष्ट्रासह केरळ, मध्य प्रदेशला केंद्राचा सतर्कतेचा इशारा

नवी दिल्ली / मुंबई : देशाला आता करोनाच्या उत्परिवर्तीत ‘डेल्टा प्लस’ विषाणूचा धोका आहे. ‘डेल्टा प्लस’ हा चिंताजनक विषाणू असून, त्याचे रुग्ण आढळलेल्या महाराष्ट्रासह केरळ, मध्य प्रदेश या राज्यांना केंद्राने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

‘डेल्टा प्लस’ हे करोनाचे ‘निरीक्षणाधीन उत्पर्विन’ असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत म्हटले होते. मात्र, ‘इन्साकॉग’ने ‘डेल्टा प्लस’ हे ‘चिंताजनक उत्परिवर्तन’ असल्याची माहिती दिल्याचे आरोग्य मंत्रालयाने नंतर जाहीर केले.

केंद्राच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्र, मध्य प्रदेश, केरळसह देशभरात ‘डेल्टा प्लस’चे २२ रुग्ण आहेत. त्यात महाराष्ट्रातील १६ रुग्णांचा समावेश असल्याचे केंद्राचे म्हणणे असले तरी महाराष्ट्र सरकारच्या आकडेवारीनुसार राज्यात या नव्या विषाणूचे २१ रुग्ण आहेत. त्यामुळे देशभरातील रुग्णसंख्या अधिक असण्याची शक्यता आहे. ‘डेल्टा प्लस’च्या फैलावाचा वेग अधिक असल्याचे मानले जाते.

महाराष्ट्रात आढळलेल्या ‘डेल्टा प्लस’च्या २१ रुग्णांपैकी बहुतांश रुग्ण लक्षणेविरहित किंवा सौम्य लक्षणे असल्याचे प्राथमिक पाहणीत आढळले आहे. या रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचे आणि बाधित रुग्णांचे नमुने तपासण्यांसह सर्वेक्षण आरोग्य विभागाने सुरू केले आहे.

‘डेल्टा प्लस’चे रत्नागिरीत नऊ, जळगावमध्ये सात, मुंबईत दोन आणि पालघर, सिंधुदुर्ग आणि ठाणे येथे प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे. रत्नागिरीत सुरुवातीला सहा रुग्णांमध्ये ‘डेल्टा प्लस’ आढळले होते. त्यानंतर ५० जणांचे नमुने जनुकीय क्रमनिर्धारणासाठी पाठविण्यात आले होते. त्यातून आणखी तीन जणांमध्ये हा विषाणू आढळला असून रत्नागिरीत या विषाणूचे सध्या नऊ रुग्ण झाले आहेत.

करोना रुग्ण संख्येने ओलांडला तीन कोटींचा टप्पा; २४ तासांमध्ये १३५८ जणांचा मृत्यू

‘डेल्टा प्लस’ बाधित आढळलेल्या रुग्णांची संख्या तुलनेने फार कमी आहे. त्यामुळे यावरून सध्या कोणताही निष्कर्ष काढणे योग्य नाही. राज्यात दर महिन्याला ३ हजार जणांचे नमुनेजनुकीय क्रमनिर्धारणासाठी पाठविले जात असून पाच रुग्णालये आणि पाच प्रयोगशाळांमधील नमुनेही पाठविले जात आहेत. त्यामुळे ही प्रक्रिया सुरूच राहिल, असे राज्याच्या साथरोग विभागाचे प्रमुख डॉ. प्रदीप आवटे यांनी सांगितले.

‘भय बाळगू नये’

करोनाच्या विषाणूचे उत्परिवर्तन होणे नैसर्गिक आहे. ‘डेल्टा’ किंवा ‘डेल्टा प्लस’ या उत्परिवर्तित प्रकारांचा धोरणात्मक दृष्टीने अभ्यास होणे गरजेचे आहे. परंतु सर्वसामान्य नागरिकांनी याचे भय बाळगू नये. करोनाच्या कोणत्याही उत्परिवर्तित विषाणूपासून संरक्षण करण्यासाठी मुखपट्टीचा वापर, अंतर नियम, हातांची स्वच्छता हेच करोना प्रतिबंधात्मक उपाय आहेत. नागरिकांनी घाबरून न जाता या उपायांचे पालन काटेकोरपणे करणे गरजेचे आहे, असे मत डॉ. प्रदीप आवटे यांनी व्यक्त केले.

Covid vaccine: करोना मृत्यू रोखण्यासाठी लसींचा पहिला आणि दुसरा डोस ८२ आणि ९५ टक्के प्रभावी

मुंबईतील दोन्ही रुग्ण लक्षणेविरहित

मुंबईत आढळलेल्या ‘डेल्टा प्लस’च्या दोन रुग्णांपैकी एक रुग्ण ठाण्याचा तर दुसरा रुग्ण पूर्व उपनगरातील आहे. दोन्ही रुग्णांना एप्रिलमध्ये करोनाची बाधा झाली होती. या दोघांनाही करोनाची कोणतीही लक्षणे नव्हती आणि गृहविलगीकरणात ते बरे झाले आहेत. त्यांच्या संपर्कातील बाधित व्यक्तींसह अन्य सर्वेक्षण सुरू केले जाईल, अशी माहिती पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी दिली.

दहा देशांत रुग्ण

भारतासह दहा देशांत ‘डेल्टा प्लस’चे रुग्ण आढळले आहेत. त्यात अमेरिका, ब्रिटन, पोर्तुगाल, स्वित्र्झलड, जपान, पोलंड, नेपाळ, चीन आणि रशिया या देशांचा समावेश आहे. तर प्रथम भारतातच आढळलेल्या ‘डेल्टा’ विषाणूचे रुग्ण आतापर्यंत ८० देशांत आढळले आहेत.

राज्यात करोनाचे ८,४७० नवे रुग्ण

मुंबई : राज्यात मंगळवारी करोनाचे ८,४७० नवे रुग्ण आढळले. दिवसभरात १८८ जणांचा मृत्यू झाला. त्याच वेळी ९ हजार ४३ रुग्ण करोनामुक्त झाले. राज्यातील उपचाराधीन रूग्णांची संख्या सध्या एक लाख २३ हजार ३४० आहे.