सुधारित नागरिकत्व कायद्यापासून (सीएए) बचाव करण्यासाठी अनेक अफगाणिस्तानी आणि रोहिंग्या मुस्लीम ख्रिश्चन धर्म स्वीकारत आहेत, जेणेकरुन भारतीय नागरिक होण्याचा त्यांना मार्ग अधिक सहज होईल. केंद्रीय यंत्रणांनी यासंबंधी केंद्र सरकारला अलर्ट दिला आहे. या संपूर्ण प्रकाराची माहिती असणाऱ्या लोकांनी माहितीनुसार, तपासादरम्यान किमान २५ अफगाणिस्तानी मुस्लिमांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला आहे. इकॉनॉमिक टाइम्सने यासंबंधी वृत्त दिलं आहे.

गतवर्षी संसदेत मंजूर करण्यात आलेल्या सुधारित नागरिकत्व कायदा २०१९ मध्ये अफगाणिस्तान, बांगलादेश आणि पाकिस्तानमधून आलेल्या हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारशी आणि ख्रिश्चन धर्मीयांसाठी नागरिकत्वाचे नियम शिथील करण्यात आले आहेत. याआधी कोणत्याही व्यक्तीला भारताचं नागरिकत्व मिळवण्यासाठी किमान ११ वर्ष भारतात वास्तव्य करणं अनिवार्य होतं. हा नियम शिथील करत नागरिकत्त्व मिळवण्यासाठी असणारा कार्यकाळ सहा वर्षांचा करण्यात आला आहे. गृहमंत्रालयाने अद्याप कायद्यामधील नियम जाहीर केलेले नाहीत.

दक्षिण दिल्लीमधील अफगाण चर्चमध्ये राहणाऱ्या आबिद अहमद मॅक्सवेल यांनी दिलेल्या माहितीनुसार, “सुधारित नागरिकत्व कायद्यानंतर अफगाणिस्तानमधील अनेक मुस्लीम ख्रिश्चन धर्म स्विकारण्यास इच्छुक आहेत”. ३४ वर्षीय आबिद अहमद २१ वर्षांचे असताना भारतात आले होते. त्याचे आई-वडील सुन्नी मुस्लीम होते. अफगाणिस्तानमधील काबूल येथे ते वास्तव्यास होते. अफगाणिस्तानमधील अनेक नागरिकांनी आश्रय मिळवण्यासाठी संयुक्त राष्ट्रांचे निर्वासितांसाठी असणाऱ्या उच्चायुक्तांकडे (UNHCR) अर्ज केला असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.

अधिकृत डाटानुसार, जवळपास दीड लाखाहून जास्त अफगाणिस्तानातील मुस्लीम दिल्लीच्या पूर्व कैलाश, लाजपत नगर, अशोक नगर आणि आश्रम येथे वास्तव्यास आहेत. याच समुदायाने नुकतंच भारतीय यंत्रणांना तालिबानी दहशतवाद्यांनी अपहरण केलेल्या अफगाण शीख निदान सिंह सचेदव यांचा शोध घेण्यास मदत केली होती. अफगाणिस्तानमधील गुरुद्वारामध्ये सेवा देण्यासाठी गेले असता तालिबानी दहशतवाद्यांनी पूर्व भागातून त्यांचं अपहरण केलं होतं.

याशिवाय अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, भारतात जवळपास ४० हजार रोहिंग्या मुस्लीम वास्तव्यास आहेत. जम्मू काश्मीरमध्ये यांची संख्या जास्त आहे. मोठ्या प्रमाणात रोहिंग्या मुस्लीम २०१२ पासून देशात वास्तव्यास असून आपण बांगलादेशी असल्याचं सांगत आहेत. तसंच ख्रिश्चन धर्म स्विकारत आहेत. गेल्या सहा वर्षात अफगाणिस्तान, बांगलादेशी आणि पाकिस्तानमधील जवळपास चार हजार लोकांना भारतीय नागरिकत्व देण्यात आलं आहे.