निती आयोगाच्या सूचनेनंतर चाचपणी

मुंबई : राष्ट्रीय वैद्यकीय प्रवेश परीक्षेप्रमाणेच (नीट) अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठीही देशपातळीवर एकच प्रवेश परीक्षा घेण्याचा केंद्रीय प्राधिकरणांचा विचार आहे. निती आयोगाच्या बैठकीत तशी सूचना करण्यात आली असून, याबाबत चाचपणी सुरू आहे.

अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी देशपातळीवर परीक्षा घेण्याबाबत केंद्रीय स्तरावर पुन्हा हालचाली सुरू झाल्या आहेत. निती आयोगाच्या गेल्या महिन्यात झालेल्या बैठकीत याबाबत चर्चा करण्यात आली. अभियांत्रिकीसाठी देशपातळीवरील सामायिक प्रवेश परीक्षा घेण्याची सूचना आयोगाच्या सदस्यांनी बैठकीत केली. ‘अभ्यासक्रमाची गुणवत्ता राखण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना देशपातळीवर समान संधी मिळावी यासाठी सामायिक प्रवेश परीक्षा असावी,’ अशी गरज सदस्यांनी व्यक्त केली.

देशपातळीवर अभियांत्रिकीसाठी एकच प्रवेश परीक्षा घेण्याचा प्रयत्न यापूर्वीही झाला. त्यातूनच ‘जेईई’ सुरू झाली. या परीक्षेला राष्ट्रीय संस्थांनी नकार दिला. त्यानंतर मेन्स आणि अ‍ॅडव्हान्स असे दोन स्तर झाले. जेईई मेन्सच्या गुणांनुसार राज्यांनी त्यांच्या अखत्यारितील संस्थांमधील प्रवेश प्रक्रिया राबवणे अपेक्षित होते. मात्र, त्याला राज्यांनी विरोध केला. त्यानंतर राज्यांसाठी ही परीक्षा ऐच्छिक करण्यात आली. त्यामुळे महाराष्ट्रासह काही राज्ये त्यांची स्वतंत्र प्रवेश परीक्षा घेतात, काही जेईई मेन्सचे गुण गृहित धरतात तर काही राज्ये बारावीच्याच गुणांआधारे प्रवेश देतात. या परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी २०१७ मध्ये पुन्हा देशपातळीवर परीक्षेची चर्चा सुरू झाली. आता निती आयोगानेही देशपातळीवरील परीक्षेची सूचना केली आहे. तसेच राष्ट्रीय शिक्षण धोरणातही याबाबत उल्लेख करण्यात आला आहे.

स्वतंत्र अभ्यासक्रम..

जेईई केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अभ्यासक्रमावर आधारित असते. या परीक्षेला विरोध होण्याचे हे प्रमुख कारण होते. प्रत्येक राज्याचा अभ्यासक्रम वेगळा असल्याने राज्यांनी जेईईला विरोध केला. त्यामुळे आता देशपातळीवरील प्रवेश परीक्षा नव्याने सुरू करायची झाल्यास त्यासाठी अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) अभ्यासक्रम तयार करावा, अशीही सूचना निती आयोगाच्या सदस्यांनी केल्याचे समजते. या परीक्षेसाठी विज्ञान शाखेतील विशिष्ट विषयांची अट न ठेवता, परिषदेने दिलेल्या यादीतील कोणतेही विषय अभ्यासणाऱ्या विद्यार्थ्यांना पात्र ठरवावे का, अभियांत्रिकीच्या कोणत्या शाखांसाठी बारावीला गणित आणि भौतिकशास्त्र अभ्यासणे अत्यावश्यक आहे या सगळ्याचा सर्वंकष आढावा घेण्यासाठी समिती नेमण्यात आली आहे.

सामायिक प्रवेश परीक्षा घ्यावी का, कशी घ्यावी आदी मुद्यांचा अभ्यास करण्यासाठी समिती नेमण्यात आली आहे. या समितीचा अहवाल डिसेंबपर्यंत मिळणे अपेक्षित आहे. तो प्राप्त झाल्यानंतर सर्व घटकांशी, राज्यांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल.

      -डॉ. अनील सहस्रबुद्धे, अध्यक्ष, एआयसीटीई