अंबडंट ग्रुपच्या संबंधात लाचप्रकरणी जी जनार्दन रेड्डी यांना केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली आहे. पोंजी घोटाळा आणि लाच प्रकरणी कर्नाटक सरकारमध्ये माजी मंत्री असलेल्या जनार्दन रेड्डी यांची शनिवारी रात्री तीन वाजेपर्यंत चौकशी केली होती. गेल्या आठवड्यात रेड्डी यांच्या घरी छापे टाकल्यानंतर त्यांच्याविरोधात नोटीस बजावली होती; तसेच त्यांना चौकशीसाठी उपस्थित राहण्यासदेखील सांगण्यात आले होते. त्यानुसार ते उपस्थित राहिले होते. त्यानंतर आता त्यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्याला अटक करण्यात आली आहे.

गेल्या तीन दिवसांपासून बेपत्ता असलेले जनार्दन रेड्डी काल (शनिवार) सायंकाळी बंगळूर पोलिसांच्या गुन्हे शाखेतील कार्यालयामध्ये चौकशीसाठी हजर झाले होते. आज त्यांना केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली. बंगळरू गुन्हे अन्वेषण विभागाने जनार्दन रेड्डींचा विश्वासू असेलेला अली खानला बेड्या ठोकल्या आहेत.

 ‘अंबडंट ग्रुप’ या खासगी उद्योगसमूहाच्या मालकाने रेड्डी यांच्यावर १८ कोटींची लाच घेतल्याचा आरोप केला होता. एका भ्रष्टाचाराच्या प्रकरणातून सुटका करण्याचे आमिष दाखवून रेड्डी यांनी पैसे लाटल्याचा आरोप करण्यात आला आहे.