फुटीरतावादी नेता यासिन मलिक याच्या जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंटवर केंद्र सरकारने बंदी घातली आहे. JKLF अर्थात जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंटवर केंद्राने बंदी घातली आहे. यासिन मलिकसाठी हा झटका मानला जातो आहे. दहशतवादविरोधी कायद्याअन्वये ही कारवाई करण्यात आली आहे. फुटीरतावादी विचारांना प्रोत्साहन देऊन त्या विचारांचा प्रसार जम्मू काश्मीरमध्ये केला जातो आहे, असा ठपका जेकेएलएफवर ठेवण्यात आला असून या बेकायदा कृत्यांवर बंदी घालण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे असे केंद्राने स्पष्ट केले आहे.

जेकेएलएफचा प्रमुख यासिन मलिक हा सध्या अटकेत असून त्याला जम्मू येथील बालवल कारागृहात त्याची रवानगी करण्यात आली आहे. काश्मीरमधल्या जमात ए इस्लामी या संघटनेवरही अशाच प्रकारे बंदी घालण्यात आली होती. त्यापाठोपाठ आता यासिन मलिकच्या जेकेएलएफवरही बंदी घालण्यात आली आहे.

दरम्यान जेकेएलएफवर बंदी घालून केंद्र सरकारने काय साध्य केले? असा प्रश्न जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी ट्विटरद्वारे विचारला आहे. जम्मू काश्मीरचा प्रश्न चर्चेने आणि शांततेने सोडवण्यासाठी यासिन मलिकने हिंसक कारवाया करणे थांबवले आहे. दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी त्यांच्या कार्यकाळात जम्मू काश्मीरसंदर्भातल्या चर्चेतही यासिन मलिकला सहभागी करून घेतले होते याचीही आठवण मुफ्ती यांनी केली आहे.