07 July 2020

News Flash

काश्मीरमधील फुटीर विचारसरणी पोसणाऱ्या ‘जेकेएलएफ’वर बंदी

जेकेएलएफ’नेच १९८९मध्ये काश्मीर खोऱ्यात काश्मिरी पंडितांच्या सामूहिक हत्या घडविल्या होत्या.

नवी दिल्ली/श्रीनगर : जम्मू आणि काश्मीरमधील फुटीर विचारसरणी पोसणारी सर्वात जुनी संघटना असलेल्या ‘जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंट’ (जेकेएलएफ) या यासिन मलिकच्या नेतृत्वाखालील संघटनेवर शुक्रवारी बंदी घालण्यात आली.

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या अंतर्गत सुरक्षाविषयक समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. १९८८पासून फुटीर चळवळीद्वारे काश्मीर खोऱ्यात घातपाती कारवायांना बळ दिल्यावरून ही कारवाई झाल्याचे केंद्रीय गृहसचिव राजीव गौबा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. दहशतवादाविरोधातील केंद्राच्या कठोर धोरणानुसार हा निर्णय घेतल्याचे ते म्हणाले.  ‘जेकेएलएफ’नेच १९८९मध्ये काश्मीर खोऱ्यात काश्मिरी पंडितांच्या सामूहिक हत्या घडविल्या होत्या. त्यामागे यासिन मलिकच होता, असे गौबा म्हणाले. जेकेएलएफने अनेक गुन्हे केले आहेत. त्यात हवाई दलाच्या चार जवानांची हत्या आणि तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री मुफ्ती महम्मद सईद यांची कन्या रुबिया यांचे अपहरण, यांचाही समावेश आहे, असे त्यांनी सांगितले.

काश्मीरमधील घातपाती कारवायांसाठी अन्य गटांना तसेच दगडफेक करणाऱ्या तरुणांना ही संघटना आर्थिक रसदही पुरवत असल्याचे उघड झाले आहे, असे ते म्हणाले.

यासिन मलिक हा जम्मूच्या कोट बालावर तुरुंगात आहे. तीन दशकांपूर्वीच्या रुबिया सईद अपहरण प्रकरणातील  तसेच चार जवानांच्या हत्या प्रकरणातील खटल्याला तो सामोरा जाणार आहे.

जेकेएलएफची कूळकथा..

’पाकिस्तानी नागरिक अमानुल्ला खान याने या संघटनेची स्थापना केली होती.

’१९७१मध्ये श्रीनगर-जम्मू विमानाचे अपहरण करून ते पाकिस्तानात नेल्यानंतर ही संघटना प्रसिद्धीस आली होती.

’या संघटनेवर जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी ३७ गुन्हे नोंदवले आहेत, तर सीबीआयने दोन गुन्हे नोंदवले आहेत.

’१९८४मध्ये भारताचे ब्रिटनमधील मुत्सद्दी अधिकारी रविंद्र म्हात्रे यांच्या हत्येतही या संघटनेचाच हात होता.

’महिनाभरात बंदी घातलेली काश्मीरमधील ही दुसरी संघटना आहे. याआधी जमात ए इस्लामीवर बंदी घालण्यात आली आहे.

विलंब का? : काश्मिरी पंडितांना गेल्या पाच वर्षांतही न्याय मिळालेला नाही. त्या निषेधात पंडितांनी दिल्लीत आंदोलनेही केली आहेत. त्यामुळे काश्मिरी पंडितांचे सामूहिक हत्याकांड घडविणाऱ्या संघटनेवर इतक्या विलंबाने आणि निवडणुकीच्या तोंडावर कारवाई का झाली, असा प्रश्नही उपस्थित झाला आहे.

काश्मीरचाच तुरुंग! : ‘जेकेएलएफ’वर बंदी घालणे हे हानीकारक पाऊल असून त्यामुळे काश्मीरचे रूपांतर खुल्या कारागृहात होईल, असे पीपल्स डेमोक्रेटिक पक्षाच्या नेत्या मेहबूबा मुफ्ती यांनी म्हटले आहे. काश्मीरचा प्रश्न दहशतवादाच्या मार्गाने सोडविण्याचा मार्ग यासिन मलिकने केव्हाच सोडून दिला आहे, तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी त्यावेळी मलिकला चर्चेसाठीही पाचारण केले होते, त्यामुळे त्याच्या संघटनेवर बंदी घालून काय साध्य होणार आहे, असा सवाल मेहबूबा यांनी केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 23, 2019 3:19 am

Web Title: central government bans yasin malik jklf
Next Stories
1 जम्मू-काश्मीरमधील चकमकीत तीन दहशतवादी ठार
2 झाकीर नाईक याच्या साथीदाराला मुंबईत ‘इडी’कडून अटक
3 ब्रेक्झिटसाठी आता ब्रिटनपुढे दोन पर्याय, विलंबाची शक्यता
Just Now!
X