केंद्र सरकारने अनुकंपावर आधारित नोकरी देण्याच्या नियमात मोठा बदल केल्यामुळे अनेकांना दिलासा मिळणार आहे. एखाद्या कर्मचाऱ्याचे अकाली निधन झाले किंवा वैद्यकीय कारणामुळे ५५ पेक्षा कमी वय असताना निवृत्त झाल्यास अशावेळी त्यांच्या जागेवर घरातील एकाला नोकरी देण्याची तरतूद आहे. आतापर्यंत केवळ पत्नी किंवा अविवाहित मुलगा-मुलगी यांनाच नोकरी मिळत. परंतु नव्या बदलानुसार आता विवाहित मुलालाही नोकरी मिळू शकते. कार्मिक मंत्रालयाने मंगळवारी यासंबंधी आदेश जारी केला आहे. अनुकंपाबाबतचे पूर्वीचे नियम जैसे थे असतील, असेही त्यात म्हटले आहे.
मंत्रालयाच्या आदेशानुसार ज्यांना २०१३ ते २०१५ च्या दरम्यान अर्ज केलेल्यांना जुन्या नियमामुळे अनुकंपावर नोकरी मिळत नव्हती. त्यांच्या अर्जावर आता पुन्हा विचार केला जाऊ शकतो. जानेवारी २०१३ मध्ये सरकारी अनुकंपावर आधारित नोकरीच्या कायद्यात बदल करण्यात आले होते. यात विवाहित मुलीलाच नोकरी मिळण्याची संधी होती. परंतु या नव्या बदलामुळे विवाहित मुलालाही नोकरीची संधी मिळेल.