महागाई भत्त्यात पाच टक्के वाढ

नवी दिल्ली : सरकारने दिवाळी-भेट दिली आहे. या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात पाच टक्के वाढ करण्याचा निर्णय बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयामुळे केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आता १२ टक्क्यांवरून १७ टक्के झाला आहे.

केंद्राच्या महागाई भत्त्यातील पाच टक्के वाढीचा लाभ ५० लाख केंद्रीय कर्मचारी आणि ६५ लाख निवृत्तिवेतनधारकांना मिळणार आहे. वाढीव महागाई भत्त्यामुळे सरकारी तिजोरीवर १५,९०९.३५ कोटींचा बोजा पडणार आहे. सणासुदीच्या दिवसांमध्ये कर्मचाऱ्यांच्या हातात पैसा आल्याने बाजारातील मागणीला चालना मिळेल, असे मानले जाते.

सध्या आर्थिक विकासाचा वेग मंदावला असून, बाजारातील मागणी कमी झाली आहे. त्यातून निर्माण झालेल्या दुष्टचक्रामुळे लोकांच्या हाती पैसा खेळण्याचे प्रमाणही कमी झाले असून, विविध क्षेत्रांमधील उत्पादनातही घट झालेली आहे. केंद्र सरकारकडून विकासाला गती देण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. दिवाळीत मध्यमवर्गीय कुटुंबांकडून मोठय़ा प्रमाणावर खरेदी होत असते. बोनस आणि इतर माध्यमांतून त्यांच्याकडे आलेल्या पैशांतून खरेदी होत असल्याने सणासुदीच्या काळात बाजारपेठेतील मागणीही वाढेल, असा अंदाज आहे.

आधारचा नियम शिथिल

पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना आधार कार्ड सक्तीचे करण्यात आले आहे. हा निर्णय १ ऑगस्टपासून लागू करण्यात आला होता. मात्र, त्यात ३० नोव्हेंबर २०१९ पर्यंत सवलत देण्यात आली आहे.

राज्य कर्मचाऱ्यांना दिवाळीआधी वेतन

राज्य शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिवाळीआधी म्हणजे २४ ऑक्टोबरला वेतन देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. सेवानिवृत्त अधिकाऱ्यांचे व कर्मचाऱ्यांचे निवत्तिवेतनही त्याच वेळी देण्यात येणार आहे. हा निर्णय शासकीय तसेच जिल्हा परिषद, विद्यापीठे आणि त्यांच्याशी संलग्न महाविद्यालये, शासकीय व अनुदानित शिक्षण संस्थांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लागू होणार आहे.