21 September 2020

News Flash

केंद्राला परीक्षा हव्यात

निर्बंधातून सूट; ‘यूजीसी’च्या भूमिकेला पाठबळ

(संग्रहित छायाचित्र)

अंतिम वर्षांच्या परीक्षा घेण्याच्या विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) भूमिकेला केंद्र सरकारने पाठबळ दिले आहे. सर्व विद्यापीठांना अंतिम वर्षांच्या परीक्षा घेण्यास अनुमती देण्यात आल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्रालयाच्या वतीने प्रतिज्ञापत्राद्वारे सर्वोच्च न्यायालयात देण्यात आली. या प्रकरणावर आज, शुक्रवारी सुनावणी होणार आहे.

परीक्षा घेण्याबाबत विद्यापीठ अनुदान आयोगाने ६ जुलै रोजी मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या होत्या. परीक्षा ऑनलाइन, ऑफलाइन किंवा संमिश्र पद्धतीने घेण्याची मुभाही आयोगाने दिली. या परीक्षा ३० सप्टेंबपर्यंत पूर्ण कराव्यात, अशा सूचना आयोगाने विद्यापीठांना दिल्या होत्या.

या प्रकरणात भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने केंद्रालाही दिले होते. त्यावर भूमिका मांडताना केंद्रीय गृहमंत्रालयाने आयोगाच्या निर्णयाचे समर्थन करीत परीक्षांना अनुमती देण्यात आल्याचे स्पष्ट केले. याबाबत मनुष्यबळ विकास मंत्रालयाशीही चर्चा करण्यात आली. टाळेबंदी शिथिलीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यातही शैक्षणिक संस्था ३१ ऑगस्टपर्यंत बंद असल्या तरी अंतिम वर्षांच्या परीक्षा व मूल्यमापनासाठी त्यांना र्निबधातून सूट देण्यात आल्याचे गृहमंत्रालयाने न्यायालयात सांगितले.

..तर शैक्षणिक दर्जावर परिणाम

अंतिम वर्षांच्या परीक्षा न घेण्याचा महाराष्ट्र आणि दिल्ली सरकारचा निर्णय उच्चशिक्षणाच्या दर्जावर परिणाम करणारा असून, तो विद्यार्थ्यांच्या हिताचा नाही, अशी भूमिका विद्यापीठ अनुदान आयोगाने गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्राद्वारे मांडली. अंतिम वर्षांची परीक्षा न घेता पदवी दिली जावी, अशी मागणी केली जात असली तरी असे पाऊल विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी चुकीचे ठरेल, असे आयोगाने म्हटले आहे.

हस्तक्षेपास कर्नाटक उच्च न्यायालयाचा नकार

बेंगळूरु : कर्नाटकमधील व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी होणाऱ्या प्रवेश परीक्षेत हस्तक्षेप करण्यास कर्नाटक उच्च न्यायालयाने गुरुवारी नकार दिला. १९ ऑगस्टला नियोजित असलेल्या या परीक्षा घेण्याविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. करोना फैलावाच्या पार्श्वभूमीवर ही परीक्षा पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली होती. या परीक्षेचा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्यावर काहीही परिणाम होणार नसल्याने ती तातडीने घेण्याचे कारण नाही, असे याचिकाकर्त्यांनी म्हटले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 14, 2020 12:19 am

Web Title: central government has supported the role of the ugc in conducting final year examinations abn 97
टॅग Coronavirus
Next Stories
1 परीक्षा न घेतल्यास शैक्षणिक दर्जावर परिणाम
2 बंगळूरुमधील हिंसाचारात ‘एसडीपीआय’चा हात
3 फौजदारी अवमानाबाबतची याचिका मागे घेण्यास याचिकाकर्त्यांना परवानगी
Just Now!
X