सातवा वेतन आयोग लागू होण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी होळीच्या मुहूर्तावर अनोखी भेट दिली आहे. केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ६ टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला. याचा फायदा देशभरातील ८० लाख कर्मचाऱ्यांना मिळणार आहे.
सध्या सरकारी कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचे वेध लागले आहेत. यामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनात घसघशीत वाढ होणार आहे. केंद्राने अद्याप याबाबत निर्णय घेतला नसला तरी तो लागू होणार, हे निश्चित आहे. केव्हा लागू होणार, याचीच प्रतीक्षा आहे.
या पाश्र्वभूमीवर केंद्राने बुधवारी महागाई भत्त्यात वाढ करून कर्मचाऱ्यांना दिलासा दिला आहे. नव्या निर्णयामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ११९ टक्क्यांवरून १२५ टक्क्यांवर गेला आहे. हा भत्ता १ जानेवारी २०१६ पासून लागू होणार आहे, यामुळे सरकारच्या तिजोरीवर एकूण ८ हजार कोटींचा बोझा पडणार आहे. यापूर्वी सरकारने सप्टेंबर २०१५ मध्ये कर्मचाऱ्यांच्या भत्त्यात वाढ के ली होती, हे येथे उल्लेखनीय.