राहुल त्रिपाठी, नवी दिल्ली

पद्म किताबासाठी नेमलेल्या शोध समितीने इस्रोचे प्रमुख के. सिवन यांच्यासह २६ कर्तृत्ववंतांची शिफारस केली होती, मात्र केवळ संगीतकार शंकर महादेवन आणि प्रा. सुभाष काक हे दोघे वगळता इतरांचा पद्मगौरवासाठी केंद्र सरकारने विचार केला नसल्याचे समजते.

‘मिशन शक्ती’ या खास मोहिमेद्वारे उपग्रहनाशक क्षेपणास्त्राची इस्रोने अलीकडेच यशस्वी चाचणी घेतली. त्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय संशोधकांच्या चिकाटीचा आणि प्रज्ञेचा गौरव केला होता. मात्र पद्म किताबांच्या वेळी त्यांच्यासह अन्य २४ जणांची नावे अंतिम फेरीपर्यंत पोहोचली नसल्याचे समजत आहे.

या नावांमध्ये सिवन यांच्यासह आयआयटी मुंबईचे संचालक देवांग खक्खर आणि चित्रपट दिग्दर्शक भारतबाला गणपती यांचा समावेश होता.

पद्म किताबांच्या अंतिम यादीत ज्यांची नावे आली नाहीत अशा नामवंतांमध्ये समाजसेविका जिरु बिलिमोरिया, भाभा अणू संशोधन केंद्राचे संशोधक पी. के. वट्टल, निंबकर कृषी संशोधन संस्थेचे संचालक अनिल राजवंशी, भारतीय कृषी संशोधन मंडळाच्या ऊस संशोधन संस्थेचे संचालक डॉ. बक्षी राम, इम्फाळ येथील केंद्रीय कृषी विद्यापीठाचे उपकुलगुरू एस. अय्यप्पन, मेवाती घराण्याचे शास्त्रोक्त गायक पं. संजीव अभ्यंकर, चित्रपट दिग्दर्शक केतन मेहता आणि टपाल तिकिटांची रचना करणारे चित्रकार सांखा सामंता यांचा समावेश होता.

विविध मंत्रालये आणि विभागाच्या अधिकाऱ्यांचा सहभाग असलेल्या शोध समितीकडे शिफारशीची जबाबदारी असते. गृहमंत्रालयातील सूत्रांनुसार केंद्रीय मंत्रिमंडळ सचिव पी. के. सिन्हा यांच्या अध्यक्षतेखालील पुरस्कार समितीला या नावांची शिफारस पाठविण्यात आली होती.

या समितीत राज्यसभेचे उपसभापती हरिवंश, स्टेट बँक ऑफ इंडियाच्या माजी अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य, राज्यसभा सदस्य स्वपन दासगुप्ता, संगीत नाटक अकादमीचे अध्यक्ष शेखर सेन, माजी केंद्रीय मंत्री आरिफ महम्मद खान, केंद्रीय गृहसचिव राजीव गौबा, राष्ट्रपतींचे सचिव संजय कोठारी, पंतप्रधानांचे अतिरिक्त प्रधान सचिव पी. के. मिश्रा यांचा समावेश होता.