समाधानकारक पावसामुळे उत्पादन वाढण्याचे केंद्राचे संकेत

सलग दुसऱ्या वर्षी देशात चांगला आणि समाधानकारक पाऊस झाल्यामुळे यंदाच्या वर्षांत खरीप हंगामात कृषी उत्पादन गेल्या वर्षीच्या तुलनेत जास्त होईल, अशी सुवार्ता आहे. गेल्या वर्षी १३८.०४ दशलक्ष टन एवढे कृषी उत्पादन झाले होते. त्यात यंदा वाढ होणार असल्याचे केंद्रीय कृषी सचिव शोभना पटनायक यांनी सांगितले. खरिपाच्या हंगामात आतापर्यंत भात, डाळी, तेलबिया, कापूस, ऊस आणि ताग यांची ८० टक्के पेरणी पूर्ण झाली असून पुढील महिन्यापर्यंत ती सुरू राहील, असे पटनायक म्हणाले. देशात आतापर्यंत चांगल्या पावसाची नोंद झाली आहे. कर्नाटकात काही भागात दुष्काळी परिस्थिती आहे. तर देशभरात १९ लाख हेक्टर क्षेत्रातील पिकांना पुराचा फटका बसला आहे. पूरस्थिती असलेल्या राज्यांत पाणी ओसरल्यानंतर पुन्हा खरिपाची दुसरी पिके घेता येणार आहेत. त्यामुळे गेल्या वर्षीपेक्षा खरिपाचे कृषी उत्पादन जास्त होईल, यात शंका नसल्याचे पटनायक यांनी नमूद केले. खरिपाच्या एकरी लागवडीत तीन टक्के वाढ झाली आहे. कर्नाटकाच्या दक्षिण भागात परिस्थिती अवघड आहे. गेल्या आठवडय़ापर्यंत शेतक ऱ्यांनी ८७८.२३ लाख हेक्टर क्षेत्रात लागवड केली आहे. गेल्या वर्षी ती याच काळात ८५५.८५ लाख हेक्टर होती. तांदूळ हे या हंगामातील महत्त्वाचे पीक असून आतापर्यंत २८०.०३ हेक्टर क्षेत्रात तांदळाची लागवड झाली आहे. गेल्या वर्षी हे प्रमाण २६६.९३ लाख हेक्टर होते.

पिकांची आताची लागवड, कंसात गेल्या वर्षीची लागवड पुढीलप्रमाणे..

  • डाळी १२१.२८ लाख हेक्टर (११६.९५ लाख हेक्टर)
  • तेलबिया १४८.८८ लाख हेक्टर (१६५.४९ लाख हेक्टर). यातून तेलबियांचे क्षेत्र कमी झालेले दिसत आहे
  • तूरवगळता इतर डाळींचे क्षेत्र जास्त आहे. ऊस व कापूस यांचे क्षेत्र गेल्या वर्षीपेक्षा वाढले असून उत्पादनही जास्त होणार आहे
  • गुजरातेत कपाशीची लागवड वाढली असली, तरी पावसामुळे काही लागवड वाया गेली आहे. त्यात आता डाळींचे उत्पादन घेता येईल
  • कपाशीचे क्षेत्र ११४.३४ लाख हेक्टर झाले आहे ते गेल्या वर्षी ते ९६.४८ लाख हेक्टर होते
  • उसाचे क्षेत्र ४५.६४ लाख हेक्टर होते ते आता ४९.७१ लाख हेक्टर झाले आहे. यात मोसमी पाऊस चांगला होणे व कारखान्यांनी थकबाकी अदा करणे ही दोन कारणे आहेत
  • अन्नधान्याचे उत्पादन १३८.०४ दशलक्ष टन होण्याची शक्यता असून ते गेल्या वर्षीपेक्षा जास्त असेल शिवाय २०१३-१४ मधील १२८.६५ मेट्रिक टन पेक्षाही जास्त असेल