जैन समाजाला अल्पसंख्याक दर्जा देण्याबाबत सरकार विचार करीत असल्याची माहिती गुरुवारी लोकसभेत  देण्यात आली. जैन समाजाला अल्पसंख्याक समुदायाचा दर्जा देण्याबाबत अनेक निवेदने आल्याची माहिती केंद्रीय अल्पसंख्याकमंत्री के. रहमान खान यांनी लेखी उत्तराद्वारे सभागृहात दिली.
देशातील जैन समाजाला अल्पसंख्याकाचा दर्जा देणार का, याबाबतच्या प्रश्नावर खान यांनी लेखी उत्तर दिले असून हा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.
सध्याच्या कायद्यानुसार मुस्लीम, ख्रिश्चन, शीख, बौद्ध आणि पारसी समाजाला अल्पसंख्याक समाजाचा दर्जा देण्यात आला आहे. तसेच अल्पसंख्याकांसाठी असलेले फायदे आणि योजनांचा लाभही त्यांना देण्यात येत आहे.
आमच्या धार्मिक प्रथा वेगळ्या असून हिंदूंसोबत आमचा समावेश करणे हे चुकीचे असल्याचे स्पष्ट करीत जैन समाजाला वेगळा दर्जा देण्याबाबतची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येत आहे.