मेट्रो रेल्वेच्या प्रवाशांसाठी केंद्र सरकारने आनंदाची बातमी दिली आहे. देशातील सर्वच मेट्रोंमध्ये प्रवास करता येण्यासारखे ‘वन मेट्रो वन कार्ड’ केंद्र सरकार सुरू करण्याच्या तयारीत आहे. दरम्यान, मेट्रोच्या ठराविकच फेऱ्यांसाठी या कार्डाचा उपयोग करता येणार आहे. तसेच अन्य राज्यांमध्ये या कार्डचा वापर करायचा असल्यास कार्ड केवळ काऊंटरवर नेऊन ते रिचार्ज करावे लागणार आहे.

काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने ‘वन नेशन वन कार्ड’ योजना लाँच केली होती. या कार्डच्या माध्यमातून कोणत्याही राज्यांमध्ये परिवहन सुविधेचा लाभ घेता येणार आहे. दरम्यान, या सेवेचा लाभ घेण्यासाठी ‘केवायसी’ प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य असेल. तसेच यासाठी बँकांची मदत घेता येणार आहे. हे मेट्रो कार्ड क्रेडिट आणि डेबिट कार्ड प्रमाणेच असेल. टाईम्स ऑफ इंडियाने याबाबत वृत्त दिले आहे.

पुढील सहा महिन्यांमध्ये हे कार्ड लाँच होण्याची शक्यता आहे. दरम्यान, भारतात फिरण्यासाठी किंवा कमी कालावधीसाठी वास्तव्यास येणाऱ्या लोकांना या कार्डाचा लाभ घेता येणार नसल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. तसेच ‘केवायसी’ प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय हे कार्डही देण्यात येणार नाही. अशा लोकांसाठी पर्यायी कार्डाचा विचार सुरू असून त्यासाठी पासपोर्ट किंवा आधार कार्ड देणे बंधनकारक करण्यात येणार आहे. परदेशी नागरिकांना त्यांच्या पासपोर्टची फोटो प्रत द्यावी लागणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

देशातील निरनिराळ्या मेट्रो नेटवर्कचे भाडे निरनिराळे असल्यामुळे हे कार्ड अपग्रेड करावे लागणार आहे. सध्या कार्डाचे काम सुरू असून लवकरच याच्या स्पेसिफिकेशन्सवरही काम सुरू करण्यात येणार आहे. इलेक्ट्रॉनिक विभागाचे विशेष युनिट यावर सध्या काम करत असल्याची माहितीही अन्य अधिकाऱ्याने दिली.