रमझान, अमरनाथ यात्रा शांततेत पार पाडण्यासाठी प्रयत्न

श्रीनगर : रमझानचा महिना आणि अमरनाथ यात्रेच्या पाश्र्वभूमीवर काश्मीरमधील अतिरेकी गटांशी केंद्र सरकारने शस्त्रसंधी करावी, यावर जम्मू आणि काश्मीरमधील सर्वपक्षीय बैठकीत बुधवारी एकमत झाले. तशी विनंती आता केंद्राकडे करण्यात येईल, असे मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी सांगितले.

अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार असताना २००३मध्ये असा करार झाला होता. त्याचे स्मरण करून देत मुफ्ती यांनी पत्रकारांना सांगितले की, ‘‘चकमकी आणि अतिरेक्यांवरील कारवायांची झळ सामान्यांनाही अधिक बसत आहे. त्यामुळे रमझान आणि अमरनाथ यात्रा शांततेत पार पडावी, यासाठी अशा शस्त्रसंधीची गरज आहे.’’

काश्मिरातील हिंसाचाराला राजकीय मार्गानेही सकारात्मक प्रत्युत्तर मिळाले पाहिजे, यावरही बैठकीत एकमत झाले. मुख्यमंत्री मुफ्ती यांनी मंगळवारी सायंकाळी राज्यपाल एन. एन. व्होरा यांच्याशी चर्चा केल्यानंतर ही बैठक बोलावण्यात आली होती.

अतिरेकी आणि सुरक्षा दलांतील वाढलेल्या चकमकी, त्यात निरपराध नागरिकांचे झालेले मृत्यू आणि दगडफेकीच्या घटना; यामुळे काश्मीर खोऱ्यात उद्भवलेल्या स्थितीबाबतही या बैठकीत चर्चा झाली.

बंकरची मागणी

पाकिस्तानलगतच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळील मेंधर क्षेत्रातील लोकांनी बंकर बांधून देण्याची मागणी केली आहे. पाकिस्तानकडून तोफगोळ्यांचा मारा झाला की येथील नागरिकांची मोठय़ा प्रमाणात हानी ओढवते. बंकरमुळे त्यांना सुरक्षितपणे राहता येईल, असे त्यांचे म्हणणे आहे. केंद्र सरकारने जानेवारीत सुमारे १५ हजार बंकर बांधून देण्यासाठी ४१५ कोटी रुपयांची तरतूद केली आहे.