राज्यांशी आणखी चर्चा करण्याची जे. पी. नड्डा यांची ग्वाही

राष्ट्रीय पात्रता प्रवेश चाचणीच्या (नीट) मुद्दय़ावर राज्यांशी आणखी चर्चा करण्यात येईल, असे केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी सोमवारी स्पष्ट केले. नड्डा यांनी ‘एम्स’मध्ये राज्यातील आरोग्यमंत्र्यांची बैठक घेतली. त्यात राज्यांची भूमिका समजून घेतल्यानंतर आणखी चर्चेची गरज व्यक्त करीत नड्डा यांनी ‘नीट’च्या मुद्दय़ावर लवकरच तोडगा काढण्याचे संकेत दिले.

महाराष्ट्रासह विविध राज्यांनी ‘नीट’ला केलेल्या विरोधाच्या पाश्र्वभूमीवर केंद्र सरकारने पावले उचलत सोमवारी आरोग्यमंत्र्यांची बैठक घेतली. ‘नीट’बाबत राज्यांची भूमिका, अभ्यासक्रम आणि भाषा या मुद्दय़ांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली. देशभरात ‘नीट’ चाचणी घेण्याआधी राज्यांची समस्या विचारात घेणे महत्त्वाचे असून, त्यासाठी राज्यांशी आणखी चर्चा करण्यात येईल, असे नड्डा यांनी सांगितले.

‘नीट’ यंदाच घेण्याबाबत अनेक राज्यांनी चिंता व्यक्त केली आहे. त्याची नोंद घेऊन याबाबत सर्वोच्च न्यायालयाला कळविण्यात येणार आहे. त्यानंतर केंद्र सरकार या मुद्दय़ावर पुढील दिशा ठरवेल, असे नड्डा यांनी स्पष्ट केले.

देशातील एमबीबीएस आणि बीडीएस अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना यंदापासून ‘नीट’ सक्तीची करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. याबाबत महाराष्ट्रासह अनेक राज्यांतील विद्यार्थी-पालकांनी चिंता व्यक्त केली आहे.

केंद्र सरकारकडून अध्यादेश?

विद्यार्थ्यांना यंदाच्या शैक्षणिक वर्षांत तरी ‘नीट’मधून सूट देण्याची मागणी अनेक खासदारांनी केली आहे. त्यासाठी केंद्र सरकारने अध्यादेश काढावा, अशी या खासदारांची मागणी आहे. यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकार अध्यादेश काढेल, अशी चर्चा आहे.