यंदा कांद्याने सर्वसामान्य जनतेच्या डोळ्यातून पाणी आणलं आहे. देशाच्या विविध भागांत किरकोळ बाजारात कांद्याचा भाव प्रतिकिलोमागे सव्वाशे ते दीडशे रुपयांपर्यंत पोहचला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने अतिरिक्त १२ हजार ६६० मेट्रिक टन कांदा आयातीसाठी करार केला आहे. हा कांदा २७ डिसेंबर पासून भारतात येण्यास सुरूवात होणार आहे. याचबरोबर आता आयात केल्या जाणाऱ्या एकुण कांद्याचे प्रमाण हे जवळपास ३० हजार मेट्रिक टन पर्यंत पोहचले आहे.ग्राहक व्यवहार मंत्रालयाकडून गुरूवारी ही माहिती देण्यात आली. याशिवाय केंद्रीय एजन्सी एमएमटीसी अतिरिक्त १५ हजार मेट्रिक टन कांद्यासाठी नवी निविदा काढणार असल्याची माहिती आहे.

सोलापूरात आणि बंगळुरूमध्ये शनिवारी कांदा २०० रूपये प्रतिकिलोपर्यंत पोहचला होता. कांदा निर्यातीवर बंदी घालताना कांद्याची आयात करण्यास केंद्र सरकारने परवानगी दिली असतानाही अद्याप कांद्याचे भाव नियंत्रणात न आल्यामुळे सर्वसामान्यांच्या जेवणातून कांदा गायब आहे.

केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांनी या पार्श्वभूमीवर सर्व मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले असून, बाजारातील आवक निश्चित करण्यासाठी साठवणूक विरोधी अभियान राबवण्यास तात्काळ सुरूवात करावी. तसेच, स्टॉक होर्डिंग मर्यादेची देखील काटेकोर अंमलबजावणी केली जावी, असे पत्राद्वारे सांगितले आहे.