केंद्र सरकारने सुकन्या समृद्धी योजना सुरू केल्यापासून दोन महिन्यात मुलींची १.८ लाख खाती सुरू करण्यात आली आहेत, त्यात जास्तीत जास्त खाती कर्नाटकात असून कमीत कमी खाती बिहारमध्ये आहेत.
२२ जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुलींसाठी बेटी बचाव बेटी पढाव योजनेत ही ठेव योजना जाहीर केली होती, या खात्यावर ९.१ टक्के व्याज दिले जाणार असून त्यात प्राप्ती करात सवलतही दिली जाणार आहे. अर्थ मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार कर्नाटकात ५६४७१, तामिळनाडूत ४३३६२, आंध्र प्रदेशात १५८७७ खाती उघडण्यात आली आहेत. बिहारमध्ये केवळ २०४ तर पश्चिम बंगालमध्ये ३३४ खाती उघडली आहेत.
 दिल्लीत २०५४ खाती उघडली असून हरयाणात ४१७७ खाती सुरू केली आहेत. उत्तर प्रदेशात ७६२० खाती मुलींच्या नावाने सुरू केली आहेत.
 हे खाते मुलीच्या जन्मापासून ती १० वर्षांची होईपर्यंत उघडता येते व त्यात दरवर्षी किमान १००० ते कमाल दीड लाख रुपये ठेवता येतात. पोस्ट कार्यालय व व्यावसायिक बँकांच्या अधिकृत शाखात हे खाते उघडता येते. ते २१ वर्षे सुरू ठेवता येते किंवा मुलगी लग्नाची म्हणजे १८ वर्षांची झाली तरी चालू ठेवता येते. मुलींच्या शिक्षणासाठी १८ वर्षांनंतर निम्मे पैसे काढता येतात.