करोनाबाधितांच्या दैनंदिन संख्येत लक्षणीय वाढ होत असल्याने केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने महाराष्ट्र आणि पंजाबमध्ये उच्चस्तरीय आरोग्य पथके पाठवली आहेत. ती करोनासाथीच्या प्रतिबंधासाठी राज्याच्या आरोग्य विभागाला मदत करतील, अशी माहिती केंद्रीय आरोग्य विभागाने शनिवारी दिली.

दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत असल्याने ‘चाचणी, शोध आणि उपचार’ ही रणनीती पुन्हा राबवण्याच्या सूचना केंद्रीय आरोग्य विभागाने राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना दिल्या आहेत.  महाराष्ट्रात पाठवलेल्या पथकाचे नेतृत्व आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयाच्या आपत्कालीन विभागातील ज्येष्ठ मुख्य वैद्यकीय अधिकारी पी. रवींद्रन, तर पंजाबमधील पथकाचे नेतृत्व दिल्लीच्या राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्राचे (एससीडीसी) संचालक एस. के. सिंग करीत आहेत, असे आरोग्य मंत्रालयाने सांगितले.

केंद्रीय पथके महाराष्ट्र आणि पंजाबमधील करोनाग्रस्त भागांना भेट देतील आणि रुग्णसंख्यावाढीमागील कारणांचा शोध घेतील. दोन्ही राज्यांचे मुख्य सचिव आणि आरोग्य सचिव यांना केंद्रीय पथकाने नोंदविलेल्या निरीक्षणांची आणि राज्याच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी कोणत्या उपाययोजना करण्याची गरज आहे त्याची माहिती दिली जाणार आहे. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात ९० हजार ०५५ उपचाराधीन रुग्ण असून पंजाबमध्ये ही संख्या सहा हजार, ६६१ इतकी आहे.

केंद्र सरकार पूर्ण ताकदीनिशी सर्वसमावेशक भावनेतून राज्यांबाबतच्या सहकार्य रणनीतीनुसार करोनाचा मुकाबला करीत आहे, असे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. केंद्रीय पथके राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यांना भेडसावणाऱ्या समस्या आणि आव्हाने यांची माहिती घेतील. करोना नियंत्रण कार्यक्रमात काही अडचणी असतील तर त्या दूर करण्याचा प्रयत्नही पथके करतील.

आठ राज्यांना सूचना

हरियाणा, आंध्र प्रदेश, ओदिशा, गोवा, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड तसेच दिल्ली आणि चंडीगड येथील करोना परिस्थिती चिंताजनक असल्याने केंद्राने तेथे ‘चाचणी, शोध आणि उपचार’ या त्रिसूत्रीनुसार करोना नियंत्रण करण्याच्या सूचना केंद्रीय आरोग्य विभागाने शनिवारी दिल्या. ही आठ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील ६३ जिल्ह्य़ांमध्ये रुग्णवाढीची चिंता आहे. चाचण्यांचे प्रमाण वाढवणे, रुग्णांचा शोध घेणे, त्यांच्यावर उपचार करणे आणि लसीकरणाचा वेग वाढविणे हीच रणनीती कायम ठेवावी, अशा सूचना केंद्र सरकारने केल्या आहेत.

..तर महाराष्ट्रातील प्रवाशांना मध्य प्रदेशात प्रवेश

भोपाळ : महाराष्ट्रातून येणाऱ्या प्रवाशांना करोना संसर्ग नसल्याचा चाचणी अहवाल बंधनकारक करण्याचे निर्देश मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दिले आहेत. याबाबतची जबाबदारी बसचालकांवर असेल. ते करोना चाचणी अहवाल तपासूनच ते प्रवाशांना बसमध्ये प्रवेश देतील,’ असे चौहान यांनी सांगितले.

देशात ३६ दिवसांनंतर प्रथमच १८,३२७ नवे रुग्ण

नवी दिल्ली : देशात जवळपास ३६ दिवसांनंतर प्रथमच १८ हजार ३२७ नवे रुग्ण आढळल्याने बाधितांची एकूण संख्या एक कोटी ११ लाख, ९२ हजार ०८८ वर पोहोचली, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीने सांगण्यात आले. देशात करोनामुळे आणखी १०८ जणांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या एक लाख ५७ हजार ६५६ वर पोहोचली आहे.

नवीन रुग्णांपैकी ८२ टक्के महाराष्ट्रासह पाच राज्यांतले

महाराष्ट्रासह केरळ, पंजाब, कर्नाटक आणि तमिळनाडूमध्ये करोना रुग्णसंख्या अधिक आहे. देशात गेल्या २४ तासांत संसर्ग झालेल्या रुग्णांपैकी ८२ टक्के  रुग्ण या पाच राज्यांमधील आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली.