कोळिकोड : येथे एका बारा वर्षांच्या मुलाचा निपाह विषाणूने रुग्णालयात मृत्यू झाला असल्याचे आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी सांगितले. या मुलाच्या रक्ताचे नमुने पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडे पाठवण्यात आले होते. त्यात त्याचा मृत्यू निपाह विषाणूने झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

केंद्र सरकारने राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्राची पथके राज्याकडे रवाना केली असून ती रविवारी तेथे पोहोचली आहेत. राज्याला तांत्रिक साहाय्य करण्यात ही पथके मदत करतील.

निपाह हा विषाणू लाळेतून पसरतो. फळझाडांवरील वटवाघळांच्या लाळेत तो असतो. या प्रकरणाची अधिक माहिती देताना मंत्र्यांनी सांगितले की, सकाळी पाच वाजता या मुलाचा मृत्यू झाला. या मुलाची प्रकृती शनिवारी रात्रीपासून चिंताजनक बनली होती. आम्ही वेगवेगळी पथके तयार केली असून मुलाच्या प्राथमिक संपर्कात आलेल्या निकटच्या व्यक्तींचा शोध घेण्यात येत आहे.

मंत्र्यांनी सांगितले की, पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने शनिवारी रात्री या मुलाचा मृत्यू निपाह विषाणूने झाल्याचे स्पष्ट केले आहे. प्लाझ्मा, सीएसएफ व सीरम या तीन घटकांत हा विषाणू आढळून आला आहे. मुलाला खूप ताप आल्याने चार दिवसांपूर्वी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शनिवारी सकाळी त्याची प्रकृती बिघडली. शुक्रवारी मुलाचे नमुने तपासणीसाठी पाठवले होते.

मंत्री जॉर्ज यांनी सांगितले की, या मुलाच्या निकटच्या संपर्कातील व्यक्तींमध्ये अजून लक्षणे आढळलेली नाहीत. त्यामुळे काळजी करण्यासारखे काही नाही. विशेष अधिकारी या कामी नेमण्यात आले असून विशेष पथके स्थापन करण्यात आली आहेत. या मुलास प्रथम खासगी रुग्णालयात नेले होते नंतर वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. पुन्हा खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची संपर्क तपासणी करण्यात आली असून  शेजारील कन्नूर व मल्लपुरम जिल्ह्यातील लोकांना दक्ष राहण्यास सांगण्यात आले आहे.

पोलिसांनी तीन कि.मी त्रिज्येच्या परिसरात मुलाच्या घराभोवती वेढा घातला होता.

निपाह विषाणूचा पहिला उद्रेक १९ मे २०१८ रोजी कोळिकोड  येथे झाला होता. त्या वेळी १७ जण मृत्युमुखी पडले होते, तर इतर १८ रुग्ण १ जून २०१८ अखेर सापडले होते.

हा विषाणू केरळात पुन्हा सापडला असल्याने काही सार्वजनिक आरोग्य उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्यात कुटुंबाची पाहणी करण्यात येत असून तो भाग व मल्लपुरम भागात दक्षता घेतली जात आहे. निपाह विषाणूचा पहिला उद्रेक १९ मे २०१८ रोजी कोझीकोड  येथे झाला होता. त्या वेळी १७ जण मृत्युमुखी पडले होते, तर इतर १८ रुग्ण १ जून २०१८ अखेर सापडले होते.

दोन आरोग्य कर्मचाऱ्यांत लक्षणे 

कोळिकोड : केरळात निपाह विषाणूने एका बारा वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्यानंतर आता दोन आरोग्य कर्मचाऱ्यांतही निपाहची लक्षणे आढळली आहेत. हे दोन जण त्या मुलाच्या संपर्कात आलेल्या वीस जोखमीच्या व्यक्तींपैकी आहेत. आतापर्यंत १८८ संपर्क शोधण्यात आले असून पाहणी पथकाने त्यातील जास्त जोखमीचे वीस संपर्क व्यक्ती शोधून काढले आहेत. ते दोघे आरोग्य कर्मचारी आहेत. त्यातील एक जण खासगी रुग्णालयात काम करणारा असून दुसरा कोळिकोड  मेडिकल कॉलेज रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांपैकी एक जण आहे. आरोग्यमंत्री जॉर्ज यांनी निपाहच्या बळीनंतर उच्चस्तरीय बैठक घेतली असून त्यांनी सांगितले की, एकूण वीस जोखमीच्या व्यक्तींना कोळिकोड वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे. मुलाच्या संपर्कात आलेल्या इतरांना विलगीकरणात ठेवण्यात येणार आहे.