करोनाच्या दुसऱ्या लाटेत आरोग्य व्यवस्था आणि वैद्यकीय उपकरणांचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवत होता. ऑक्सिजन अभावी अनेकांना प्राणाला मुकावं लागल्याचीही घटना समोर आल्या होत्या. व्हेंटिलेटर्सचीही मोठ्या प्रमाणात मागणी होती. असं असताना अडचणीच्या काळात केंद्र सरकारने व्हेंटिलेटर्सचा पुरवठा केला नसल्याचा बातम्या काही प्रसारमाध्यमातून समोर आल्या होत्या. १३ हजार व्हेंटिलेटर्स धूळ खात पडली होती. मात्र त्याचं वितरण केलंच नाही असं सांगण्यात आलं होतं. त्यावर केंद्र सरकारने स्पष्टीकरण देत या बातम्या निराधार असल्याचं सांगितलं आहे. केंद्र सरकारने व्हेंटिलेटर्स वितरीत केले नाहीत, हे वृत्त खोटं असल्याचं सांगितलं आहे. तसेच केंद्र सरकारकडून पुरवलेले व्हेंटिलेटर्स काही राज्यांनी वापरले नसल्याचा आरोपही केला आहे.

“रुग्णलयांकडून मागणी होत नसल्याने काही राज्यांनी व्हेंटिलेटर्सचं वाटप केलं नाही. त्यामुळे केंद्रीय आरोग्य सचिवांनी काही राज्यांना व्हेंटिलेटर्स रुग्णालयांना देण्याची सूचना केली होती. तसेच अतिरिक्त मागणी असल्यास मागणी करावी असंही सांगितलं होतं. त्यानंतर अनेकदा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना आठवण करून दिली होती.”, असंही केंद्र सरकारकडून सांगण्यात आलं आहे.

“प्रत्येक व्हेटिंलेटर्स राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना योग्यवेळी वितरीत केलं होतं. त्यामुळे माध्यमात आलेल्या बातम्या निराधार आहेत”, असं स्पष्टीकरण केंद्र सरकारकडून देण्यात आलं आहे. त्याचबरोबर करोनाच्या दुसऱ्या लाटेच्या सुरुवातीपासून व्हेंटिलेटर्सची ऑडर देण्यात आली होती. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने १७ मार्च २०२० ते २७ मार्च २०२१ पर्यंत ५८ हजार ८५० व्हेंटिलेटर्स ऑर्डर केले होते.