राज्य सरकार दरनियंत्रणासाठी केंद्रीय निधीचा वापर करत नसल्याचा कृषिमंत्र्यांचा आरोप

डाळींच्या वाढत्या किमती हा बिहार विधानसभा निवडणुकीतील कळीचा मुद्दा ठरत असतानाच केंद्र सरकारने बिहार सरकारवर दरवाढीचे खापर फोडले आहे. राज्यात डाळीच्या उत्पादनात घट झाली असून, दरनियंत्रणासाठी राज्य सरकार केंद्रीय निधीचा वापर करीत नसल्याचा आरोप केंद्र सरकारने केला आहे.
केंद्र सरकारने बिहारसह राज्य सरकारांना याबाबत सहा पत्रे पाठविली आणि दरनियंत्रण निधीचा लाभ घेण्यास सांगितले, मात्र नितीशकुमार सरकारने राजकारण केले असा आरोप केंद्रीय कृषिमंत्री राधामोहनसिंह यांनी केला.
आंध्र प्रदेश, तेलंगण, दिल्ली आणि पश्चिम बंगाल यांनी दरनियंत्रण निधीचा वापर केला, त्यामुळे तेथे १२० रुपये प्रतिकिलो दराने डाळ विकली जात आहे. दरनियंत्रण निधी राज्य सरकारने उभारला असून, त्यापैकी ५० टक्के निधी केंद्रातर्फे दिला जातो. दरवाढीबद्दल नितीशकुमार यांनी केंद्रावर खापर फोडले, त्याला राधामोहनसिंह यांनी उत्तर दिले.
बिहारमध्ये डाळींच्या उत्पादनात घट होत आहे, मात्र केंद्राने सहकार्य करूनही राज्य सरकारने उपाय आखले नाहीत, असेही कृषिमंत्री म्हणाले.

‘तिसरी आघाडी निर्णायक’
घोशवारी-बैजना (मोकामा): बिहारमध्ये तिसऱ्या आघाडीच्या पाठिंब्याविना कोणतेही सरकार स्थापन होणार नाही, असे मधेपुराचे खासदार पप्पू यादव यांनी म्हटले आहे. या निवडणुकीत दोन आघाडय़ांना बहुमत मिळण्याची शक्यता नाही, असेही पप्पू यादव यांनी म्हटले आहे. पप्पू यादव हे राष्ट्रीय जनाधिकार पार्टीचे नेते असून त्यांचा पक्ष तिसऱ्या आघाडीचा भाग म्हणून निवडणूक लढवीत आहे.

नितीशकुमारांची मोदींवर टीका
नालंदा (बिहार): देशातील जनतेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुराने दिनच आणावेत, असे आवाहन बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी केले. डाळींच्या वाढत्या किंतीबद्दल भाजपला दोष देताना नितीशकुमार यांनी, भाजपशासित राज्यांमध्येही डाळींचे दर गगनाला भिडलेला का आहेत, असा सवाल केला. डाळींच्या वाढत्या किमतीबद्दल केंद्रीय मंत्री राज्य सरकारला दूषणे देत असल्याची नितीशकुमार यांनी खिल्ली उडविली. हे खरे असल्यास केवळ बिहारमध्ये डाळीचे दर २०० रुपये प्रतिकिलो असले पाहिजेत असे ते म्हणाले. गुजरात, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात २०० रुपये प्रतिकिलो दराने डाळीची विक्री का होत आहे. मोदी यांनी अच्छे दिन स्वत:जवळच ठेवावे आणि जनतेला पुराने दिन परत करावेत, असेही नितीशकुमार म्हणाले.