‘पीडीपी’कडून मेहबूबा यांना सर्वाधिकार

श्रीनगर : केंद्र सरकारने जम्मू आणि काश्मीरमधील प्रमुख राजकीय पक्षांना २४ जून रोजी दिल्लीत चर्चेसाठी आमंत्रित केले आहे. चर्चेला जाण्याबाबत पीडीपीने पक्षाध्यक्ष मेहबूबा मुफ्ती यांना सर्वाधिकार दिले आहेत. पक्षाच्या राजकीय व्यवहार समितीची रविवारी बैठक झाली त्यात हा निर्णय घेण्यात आला.

श्रीनगरमध्ये मेहबूबा यांच्या निवासस्थानी दोन तास बैठक झाली. त्यात हा निर्णय घेण्यात आल्याचे पीडीपीचे मुख्य प्रवक्ते सईद सोहेल बुखारी यांनी सांगितले. याबाबत गुपकर आघाडीची मंगळवारी बैठक होणार आहे. त्यामध्ये अंतिम निर्णय होईल असे त्यांनी नमूद केले.

जम्मू आणि काश्मीरमध्ये राजकीय प्रक्रियेला गती देण्यासाठी केंद्राने १४ राजकीय पक्षाच्या नेत्यांना बैठकीचे आमंत्रण दिले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत ही बैठक होणार आहे. ५ ऑगस्ट २०१९ रोजी जम्मू आणि काश्मीरचा विशेष दर्जा काढून केंद्रशासित प्रदेश घोषित केल्यानंतर राजकीय पक्षांशी हा पहिलाच संवाद आहे.

फारुख यांची   नेत्यांशी चर्चा

केंद्र सरकारने चर्चेचे आमंत्रण दिल्यानंतर नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांनी रविवारी पक्षाच्या नेत्यांशी चर्चा केली. उद्याही ही चर्चा सुरू राहील, असे पक्षनेते वणी यांनी नमूद केले. त्यानंतरच चित्र स्पष्ट होईल असे त्यांनी सांगितले.