पाटीदार अनामत आंदोलन समितीचे नेते हार्दिक पटेल यांना केंद्र सरकारकडून ‘वाय’ दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आली आहे. गुप्तचर यंत्रणेने हार्दिक पटेल यांच्या जीवाला धोका असल्याचा अहवाल दिल्यानंतर ही सुरक्षा देण्यात आली. त्यामुळे आजपासून केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे जवान हार्दिक पटेल यांना सुरक्षा पुरवणार आहेत. हार्दिक पटेल यांच्या सुरक्षेसाठी ‘सीआयएसएफ’चे आठ जवान तैनात राहणार आहेत.

सुरक्षा यंत्रणा आणि केंद्रीय गुप्तचर यंत्रणांच्या अहवालात हार्दिक पटेल यांच्या जीवाला धोका असल्याची माहिती देण्यात आली होती. त्यामुळे त्यांना ‘वाय’ दर्जाची सुरक्षा देण्यात आली. याबद्दल हार्दिक पटेल यांच्याशी ‘इंडियन एक्स्प्रेस’ने संवाद साधला असता, वाय दर्जाची सुरक्षा स्वीकारली असल्याची माहिती त्यांनी दिली. ‘माझ्यासोबत सीआयएसएफ जवानांच्या दोन तुकड्या असतील. सीआयएसएफचे जवान कायम माझ्यासोबत असणार आहेत. माझा राज्यातील पोलिसांवर विश्वास नाही. मात्र मला देशाच्या जवानांवर विश्वास आहे. त्यामुळेच मी सुरक्षा स्वीकारण्याचा निर्णय घेतला,’ असे पटेल यांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले.

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हार्दिक पटेल यांच्या जीवाला धोका आहे. त्यामुळेच त्यांना सुरक्षा पुरवण्याचा निर्णय केंद्र सरकारकडून घेण्यात आला. देशातील ६० अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना (व्हीआयपी) ‘सीआयएसएफ’कडून सुरक्षा पुरवली जाते. यामध्ये राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांचा समावेश आहे.

याआधी हार्दिक पटेल यांना राज्य सरकारकडून सुरक्षा पुरवली जाणार होती. मात्र त्यांनी ही सुरक्षा नाकारली होती. सरकारला आपल्या हालचालींवर नजर ठेवायची असल्यानेच पोलीस संरक्षण दिले जात असल्याचा आरोप हार्दिक यांनी केला होता. हार्दिक प्रमाणेच गुजरातमधील दलित नेते जिग्नेश मेवाणी यांनीदेखील सरकारकडून दिली जाणारी सुरक्षा नाकारली होती. मात्र आता त्यांच्यासोबत दोन सुरक्षारक्षक तैनात असतात. गुजरातमध्ये ९ आणि १४ डिसेंबरला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे.