महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यात करोनानं मगरमिठी आवळली आहे. करोना प्रसाराचा वेग प्रचंड वाढला असून, दिवसेंदिवस रुग्णसंख्येत मोठी वाढ होत आहे. विशेष म्हणजे देशातील काही जिल्ह्यांत करोनाचा उद्रेक झाल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं म्हटलं असून, या जिल्ह्यातील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी केंद्राने राज्यांना महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. नवीन कृती कार्यक्रम केंद्राने हाती घेतला असून, राज्यांनाही सूचना दिल्या आहेत.

महाराष्ट्रासह काही राज्यात करोनाची दुसरी लाट आली आहे. चिंतेची बाब म्हणजे दुसऱ्या लाटेनं तर महाराष्ट्रातील रुग्णसंख्येचे आतापर्यंतचे उच्चांक मोडीत काढला आहे. त्याचबरोबर इतरही ७ राज्यात करोनानं डोकं वर काढल्यानं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्यांना करोना नियंत्रणासाठी कृती कार्यक्रम दिला आहे.

केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी याबद्दलची मंगळवारी माहिती दिली. ज्या जिल्ह्यांमध्ये करोना रुग्णांची संख्या प्रचंड वेगानं वाढत आहे. राज्य सरकारने त्या जिल्ह्यांमधील ४५ वर्षांवरील नागरिकांचं लसीकरण दोन आठड्यात पूर्ण करावं. लसीकरण करताना ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्य दिलं जावं. त्याचबरोबर करोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्या २५ ते ३० जणांचा शोध घ्यावा, त्यांच्या विलगीकरणाची व्यवस्था करण्यात यावी, जेणेकरून करोना रुग्णसंख्या कमी करण्यात यश येईल, असं केंद्रानं म्हटलं आहे.

राजेश भूषण यांनी राज्यांच्या मुख्य सचिवांना यासंदर्भात पत्रही पाठवलं आहे. करोना नियंत्रणासाठी राज्यांनी पोलीस कायदा आणि आपत्ती व्यवस्थापन अधिकारांचा जिल्हास्तरावर योग्यपणे वापर करायला हवा. कंटेनमेंट झोन असलेल्या परिसरातील करोना पॉझिटिव्ह लोकांना वा कुटुंबांना घरातच क्वारंटाइन केल्यानं फार परिणामकारक ठरणार नाही. त्याऐवजी कंटेनमेंट झोन करून नियमांची कठोर अंमलबजावणी करावी लागेल. टेस्टिंग, ट्रॅकिंग आणि ट्रिटमेंट यावर भर देण्यात यावा आणि जिल्हास्तरावर कृती कार्यक्रम तयार करण्यात यावा, असंही केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्यांना सांगितलं आहे.