गृहमंत्री राजनाथ सिंह यांचा दावा; भारतीय मुस्लिमांचा ‘आयसिस’ला थारा नाही
देशातील कट्टरतावाद, दहशतवाद आणि माओवादी कारवायांना आळा घालण्यात सरकारला मोठय़ा प्रमाणात यश आले असल्याचा दावा गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी केला. भारतीय मुस्लीम कुटुंबे त्यांच्या मुलांना कट्टरवादाच्या मार्गाने जाऊ देत नसल्यामुळे देशात आयसिसचे अस्तित्व नगण्य असल्याचेही त्यांनी अभिमानाने सांगितले.
राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) लखनौ शाखा कार्यालयाचे सोमवारी भूमिपूजन केल्यानंतर राजनाथ सिंह बोलत होते.
दहशतवाद, कट्टरतावाद आणि माओवादी कारवाया ही देशासमोरील सर्वात मोठी आव्हाने असल्याचे सांगून, हे सुरक्षाविषयक मुद्दे हाताळण्यासाठी सुरक्षा संस्थांना अत्याधुनिक तंत्राने सज्ज करण्याच्या गरजेवर गृहमंत्र्यांनी भर दिला. हल्ली गुन्हेगार अत्याधुनिक तंत्राचा उपयोग करत असताना तपास व चौकशी जुन्या पद्धती वापरून होऊ शकत नाही, असे ते म्हणाले.
राष्ट्रीय तपास यंत्रणा ज्या प्रकारे काम करत आहे, त्यामुळे ही व्यावसायिक, नि:पक्षपाती व विश्वासार्ह पद्धतीने काम करणारी सर्वोत्तम संस्था असल्याचा विश्वास केवळ देशातील लोकांनाच नव्हे, तर संपूर्ण जगाला वाटत असल्याचे उद्गार गृहमंत्र्यांनी काढले.
इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेच्या देशातील कारवायांची संख्या नगण्य असून, भारतातील मुस्लीम कुटुंबे त्यांच्या मुलांना या मार्गाने जाण्यापासून परावृत्त करतात हे त्याचे सगळ्यात मोठे कारण आहे, असे संघटनेचा उदय आणि तिचा जगाला असलेला धोका याच्या संदर्भात बोलताना राजनाथ सिंह यांनी सांगितले. आयसिसचे भय इतर कुठेही असू शकेल, परंतु भारतीय जीवनमूल्यांवर श्रद्धा असणारे देशातील बहुतांश लोक या संघटनेला येथे रुजू देणार नाहीत, असा मला विश्वास आहे.