अहमदाबाद : शेतकऱ्यांना कुठलाही त्रास सोसावा लागू नये म्हणून कृषी क्षेत्राला बळकटी देण्यासाठी आमचे सरकार पुढाकार घेत असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केले.

केंद्र सरकारने पारित केलेल्या नव्या कृषी कायद्यांना शेतकऱ्यांचे अनेक गट व राजकीय पक्ष विरोध करत असल्याच्या पार्श्वभूमीवर मोदी यांनी हे वक्तव्य केले आहे. कृषी, आरोग्यसेवा आणि पर्यटन विकास यांच्याशी संबंधित गुजरातमधील प्रत्येकी एक अशा ३ प्रकल्पांचे दिल्लीतून दूरचित्रसंवादाद्वारे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते.

‘शेतकऱ्यांचे उत्पन्न दुपटीने वाढवण्यासाठी आणि त्यांचा उत्पादन खर्च तसेच त्रास कमी करण्यासाठी बदलत्या काळासोबत आम्हाला आमचे प्रयत्नही वाढवावे लागतील’, असे मोदी म्हणाले. ‘शेतकऱ्यांना शेतमाल देशात कुठेही विकण्याचे स्वातंत्र्य देणे असो, किंवा कृषी उत्पादकांच्या हजारो संघटना उभारणे असो;   सिंचन प्रकल्प पूर्ण करणे असो, अथवा पीक विमा योजनेतील सुधारणा असो, या सर्वाचा उद्देश कृषी क्षेत्राला बळकटी देणे हा आहे, जेणेकरून शेतकऱ्यांना शेती करण्यात त्रास होऊ नये. त्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम सतत राबवले जात आहेत’, असे पंतप्रधानांनी सांगितले.