केंद्राने शनिवारी देशात वापरल्या जाणाऱ्या करोना लसींची सत्यता ओळखण्यासाठी काही निकषांची यादी जारी केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात बनावट कोविशील्ड लस फिरत असल्याचं म्हणत जागतिक आरोग्य संघटनेने चिंता व्यक्त केली होती. त्यानंतर केंद्र सरकारने हा निर्णय घेतलाय. हे निकष लस बनावट आहे की खरी आहे हे ओळखण्यास मदत करेल, असे आरोग्य मंत्रालयाने राज्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. सध्या देशात वापरात असलेल्या कोविशील्ड, कोवॅक्सिन आणि स्पुटनिक व्ही या लसी तयार करणाऱ्या कंपन्यांच्या माहितीने हे निकष तयार केले गेले आहेत, असेही केंद्राकडून सांगण्यात आले आहे.

केंद्राने राज्यांना पाठवलेल्या पत्रामध्ये लस उत्पादकांनी वापरलेले लेबल, रंग आणि इतर तपशील दिलेले आहेत. कोविशील्ड या भारतात तयार झालेल्या लसीच्या नावाने काही बनावट लशी दक्षिणपूर्व आशिया आणि आफ्रिकेत जप्त केल्याचा दावा करणारे विविध अहवाल अलीकडेच समोर आले आहेत. दरम्यान, भारतातही काही ठिकाणी बनावट लशी विकल्या जात असल्याचा दावा माध्यमांनी केला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने बनावट लसींबद्दल अलर्ट जारी केल्यानंतर केंद्र सरकारने अहवालांच्या आधारे याप्रकरणी चौकशीही सुरू केली आहे.

“देशात कोविशील्ड लसीच्या नावाने बनावट लसी देशात विकल्या गेल्या, असा दावा केला जात आहे. भारत सरकार या दाव्याची चौकशी करत असून आरोपांमध्ये काही तथ्य आढळल्यास कारवाई केली जाईल,” असे केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी गेल्या महिन्यात सांगितले होते.