दिल्ली हिंसाचाराच्या आक्षेपार्ह वार्ताकनाचा आरोप

नवी दिल्ली : दिल्ली हिंसाचाराचे सामाजिक दुहीस प्रोत्साहन देणारे वार्ताकन केल्याच्या कथित आरोपाखाली ४८ तासांची बंदी लागू केलेल्या ‘आशिया नेट न्यूज’ व ‘मीडिया वन’ या दोन मल्याळम वृत्तवाहिन्यांचे प्रक्षेपण पुन्हा सुरू करण्यात आले आहे.

आशियानेट न्यूजवरील बंदी पहाटे १.३० वाजता तर मीडिया वन वरील बंदी सकाळी साडेनऊ वाजता उठवण्यात आली. आता या दोन्ही वाहिन्या पुन्हा सुरू झाल्या आहेत, असे माहिती व प्रसारण खात्याने म्हटले आहे.

पुण्यात माहिती व प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले,की केंद्राने ही बंदी उठवली असून सरकार वृत्तपत्र व इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या स्वातंत्र्याचे समर्थन करते.

आशियानेट न्यूजचे संपादक एम.जी राधाकृष्णन यांनी सांगितले, की आमच्या व्यवस्थापनाने माहिती व प्रसारण खात्याशी बंदी लागू केल्यानंतर संपर्क साधला होता. मीडिया वन वाहिनीचे संपादक सी.एल.थॉमस यांनी सांगितले, की त्यांच्या वाहिनीने सरकारकडे कुठलाही संपर्क साधला नव्हता. मंत्रालयाने स्वत:हून बंदी मागे घेतली आहे. थॉमस यांनी सांगितले की, आज बंदी उठवल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे त्यामुळे आम्ही आता कुठलीही कायदेशीर कारवाई करणार नाही. आम्ही कुणाशी संपर्क साधलेला नव्हता. मंत्रालयाने स्वत:हून बंदी उठवली याचा आम्हाला आनंदच आहे. आम्ही आमचा मार्ग सोडणार नाही. पत्रकारितेच्या अभिजात मूल्यांचे पालन केले जाईल.

राधाकृष्णन यांनी म्हटले आहे की, माहिती व प्रसारण मंत्रालयाला आम्ही बंदी उठवण्यासाठी राजी करण्याचे प्रयत्न केले. त्यात आमच्या व्यवस्थापनाला यश आले. औपचारिक अर्ज हा रात्री करता येणार नव्हता त्यामुळे मंत्रालयातील लोकांशी संपर्क साधण्यात आला. आमच्या वतीने कुठलीही माफी मागण्यात आलेली नाही.

दरम्यान, जावडेकर यांनी पुण्यात सांगितले, की या प्रकरणी आपण लक्ष घालणार असून वेळ पडली तर आदेश जारी करू. माध्यमांच्या स्वातंत्र्यास सरकार वचनबद्ध आहे.

पक्षपातीपणाचा आरोप

मीडिया वन वाहिनीवर बजावण्यात आलेल्या बंदी आदेशात म्हटले होते, की सीएए समर्थकांनी गुंडागर्दी केल्याचे दाखवून दिल्ली हिंसाचाराच्या वार्ताकनात या वाहिनीने पक्षपातीपणा केला आहे, तसेच या वाहिनीने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला प्रश्न करून दिल्ली पोलिसांच्या निष्क्रियतेवर भर दिला. त्यामुळे त्यांनी दिल्ली पोलिस व राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका केल्याचे दिसून आले आहे.

‘माध्यम स्वातंत्र्याची गळचेपी’

मीडिया वन व आशियानेट  न्यूज या वाहिन्यांवर  ४८ तासांची बंदी लागू करण्यात आली होती. शुक्रवारी सायंकाळी ७.३० ते रविवारी सायंकाळी ७.३० पर्यंत या वाहिन्या बंद करण्याचा आदेश जारी करण्यात आला होता, त्यावर काँग्रेस व भाकपने टीका केली असून सरकार प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्याची गळचेपी करीत असल्याचा आरोप केला आहे.