सीबीआय ही घटनाबाह्य़ संस्था असल्याच्या गुवाहाटी उच्च न्यायालयाच्या निकालावर केंद्र सरकारला मोठा दिलासा देताना सर्वोच्च न्यायालयाने त्या निकालास स्थगिती दिली आहे.
सीबीआय म्हणजे केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग अनेक संवेदनशील प्रकरणे हाताळत असल्याने गुवाहाटी उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाच्या आधारे या प्रकरणांची सुनावणी थांबवण्याची मागणी त्यातील आरोपींनी केली आहे. त्यामुळे आम्ही तत्काळ गुवाहाटी न्यायालयाच्या निकालास स्थगिती देत आहोत, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले.
प्रतिवादी क्रमांक १ नवेंद्रकुमार यांना सर्व आक्षेप त्यांच्या उत्तरात दाखल करण्यास सांगण्यात आले आहेत. त्यांचे वकील एल. एस.चौधरी यांना दोन आठवडय़ात आपले आक्षेप नोंदवण्याची नोटीस देण्यात आली आहे. त्यानंतर केंद्र सरकार त्यावर म्हणणे मांडेल. आता या प्रकरणाची सुनावणी ६ डिसेंबर रोजी होईल.